मुंबई : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या देवळालीच्या आमदार सरोज अहिरे या आपल्या चार महिन्याच्या तान्ह्या बाळाला घेऊन विधानभवनात दाखल झाल्या. परंतु या ठिकाणी हिरकणी कक्ष व्यवस्थित स्थितीत नसल्याकारणाने त्यांना येथून काढता पाय घ्यावा लागला. या बद्दलची नाराजगी त्यांनी मीडिया समोर बोलून दाखवली.
कसा आहे हिरकणी कक्ष? : विधान भवनाच्या पहिल्या मजल्यावर स्थापन करण्यात आलेल्या हिरकणी कक्षात केवळ दोन खुर्च्या आणि दोन सोपे ठेवण्यात आलेले आहेत. या ठिकाणी दुसरी कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. यामुळे आपण या अधिवेशनात थांबायचे की नाही हा प्रश्न आता निर्माण झाला आहे. मला माझ्या मुलाची काळजी आहे. माझ्या कुटुंबांकडे तो सध्या सुरक्षित आहे. मात्र हा हिरकणी कक्ष सुरक्षित नाही. बाळाला भरवायचे असेल किंवा अन्य काही असेल तर त्या बाबतीत या ठिकाणी कुठलीही सुविधा नाही. राज्य सरकार केवळ महिलांची या निमित्ताने थट्टा करीत आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.
नागपूरच्या हिरकणी कक्षात काय होते? :आमदार सरोज अहिरे यांनी आपल्या बाळासह हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी नागपूर विधानभवनात हिरकणी कक्ष स्थापन करण्याची मागणी करण्यात केली होती त्यानंतर सरकारने त्या ठिकाणी एक डॉक्टर दोन नर्स पाळणा अशी व्यवस्था केली होती मात्र मुंबई विधानभवनात अशा पद्धतीची कुठलीही व्यवस्था नाही त्यामुळे या अधिवेशनात थांबायचे की नाही हा प्रश्न निर्माण झाला आहे असे सरोज अहिरे उदविग्नतेने म्हणाल्या.