मुंबई :आमदार रवींद्र वायकर यांनी फाईव्ह स्टार क्लब हॉटेल वीस वर्षांपूर्वी बांधले. त्यामध्ये आता त्यांना नवीन सुधारणा करायच्या होत्या. परंतु, त्यांच्या या हॉटेल बांधकामाच्या संदर्भातील मिळालेली परवानगी बेकायदेशीर आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने त्यांच्या हॉटेलमधील नवीन बांधकामाला स्थगिती दिली. भाजपचे माजी खासदार किरीट सोमैया यांनी तशी तक्रार केली होती आणि त्या तक्रारीच्यानंतर महापालिकेने स्थगिती आदेश वायकर यांना जारी केला होता. त्या स्थगितीच्या विरोधात रवींद्र वायकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती सुनील बिशुक्रे आणि न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्या खंडपीठासमोर ही याचिका दाखल केली होती. मागच्या सुनावणीच्यावेळी न्यायालयाने मुंबई महानगरपालिकेला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले होते. महापालिकेने आज प्रतिज्ञापत्र सादर केले आणि त्यात मुद्दा अधोरेखित केला की, रवींद्र वायकर यांनी बांधकाम करताना महापालिकेला काही कळवलेले नाही.
वायकरांच्या वकिलाचा युक्तिवाद :रवींद्र वायकर यांचे वकील एस पी चिनॉय यांनी या प्रतिज्ञापत्रावर आक्षेप घेत मुद्दा मांडला की, ज्या बांधकामाला मुंबई महानगरपालिकेने परवानगी दिलेली होती. त्याबाबत नगर विकास विभागाकडे पत्र देखील पाठवलेले आहे. त्यात मुद्दा अधोरेखित केलेला आहे की, रवींद्र वायकर यांच्या फाईव्ह स्टार क्लब हॉटेल शिवाय इतर दोन बांधकाम अशा एकूण तीन बांधकामांना परवानगी दिल्याचा त्यात उल्लेख आहे. मग महानगरपालिकेला याबाबत कल्पना नव्हती, असे ते कसे काय म्हणू शकतात? वकील एस पी चिनॉय यांनी यावर अधिक साधक-बाधक चर्चा होण्याची मागणी देखील केली. खंडपीठासमोर न्यायालयीन काम प्रचंड असल्यामुळे त्यांनी याबाबत दोन्ही पक्षांना आपली भूमिका मांडण्याची पूर्ण संधी दिली जाईल. तसेच याबाबत दोन्ही पक्षकारांनी तपशीलवार कागदपत्रे देखील सादर करावी, असे म्हणत ही सुनावणी पुढील सोमवारी निश्चित केली.