मुंबई- आम्ही कोणाच्या दबावाखाली राजीनामा दिलेले नाही. परंतु, आम्हाला राज्यात एक स्थिर सरकार हवे आहे. यासाठी आम्ही राजीनाम्याचा निर्णय घेतला. आता आम्ही १० आमदार यात असलो तरी उद्या (सोमवार) यातील आमदारांची बैठक होणार असून आम्ही १३ जण याच भूमिकेवर ठाम असल्याचे एस. टी. आमदार सोमशेखर यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
वांद्रे येथील सोफेटेल हॉटेलमध्ये कर्नाटक मधील काँग्रेस आणि जनता दलाचे १० आमदार कालपासून मुक्काम ठोकून आहेत. त्यामुळे कर्नाटकमध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय घडामोडी सुरू झाल्या असून कर्नाटकच्या राजकीय घडामोडींचे एक केंद्र सोफेटल हॉटेल बनल्याचे चित्र निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर कर्नाटकमधील काँग्रेसचे आमदार एस. टी.सोमशेखर यांच्यासह आमदार बी.सी.पटेल आणि जनता दल सेक्युलरचे आमदार गोपाल ऐय्या यांनी सायंकाळी माध्यम प्रतिनिधी समोर येऊन आपण कोणत्याही दबावाखाली नसल्याची माहिती दिली.
आपण आज इथे १० आमदार असून. उद्या आणखी तीन आमदार आमच्यात सामील होणार आहेत. यात काँग्रेसचे आमदार रामलिंग रेड्डी, आनंद सिंग, मुनिरत्ना हे आमच्यासोबत येत आहेत. कर्नाटकमध्ये आमच्यासमोर मुख्यमंत्री बदलण्याचा विषय नाही. तशी आमची मागणी नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या विषयी पुढे बोलताना, आम्हाला आमच्या राज्यात स्थिर सरकार हवे आहे, म्हणून आम्ही १३ जणांनी ही भूमिका घेतली आहे. त्यावर आम्ही ठाम आहोत. आगामी होणाऱ्या बैठकीला आम्ही जाणार नसून आमचा संघर्ष आम्ही सुरूच ठेऊ, अशी माहिती एस. टी. सोमशेखर यांनी दिली.
कर्नाटकच्या या 10 आमदारांनी दिला राजीनामा