मुंबई- डोंबिवली शहरात एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर भाजपचा पदाधिकारी गेली 4 वर्षे बंदुकीचा धाक दाखवून शारीरिक अत्याचार करत होता. याप्रकरणी पोलिसांनी संबंधित पदाधिकाऱ्याला पॉक्सो कायद्याअंतर्गत अटक केली होती. मात्र, जामीन मिळाल्यानंतरही संबंधित पदाधिकारी पीडित मुलगी व तिच्या कुटुंबीयांना त्रास देत आहे. यामुळे संबंधित आरोप असलेल्या भाजपच्या पदाधिकाऱ्याला येत्या सुनावणीत जामीन मिळू नये व लवकरात लवकर निर्भया प्रकरणातील आरोपींना फाशी मिळण्यापूर्वी याला न्यायालयाने शिक्षा द्यावी, अशी मागणी शिवसेना प्रवक्त्या व आमदार डॉ. मनिषा कायंदे व राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी शिवालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली आहे.
या प्रकरणात पोलिसांची भूमिका देखील संशयास्पद आहे. पीडित मुलीसह तिचे पालक व लहान बहिणीला देखील धमकवण्याचे काम सुरू असताना तक्रार करायला गेल्यावर पीडितेची तक्रार न घेता ती टाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या संबंधित पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांवर देखील कठोर कारवाई करावी, अशी मागणी कायंदे यांनी केली. तसेच या प्रकरणातील सरकारी वकील बदलून महिला वकिलाची नेमणूक करण्यात यावी, असे कायंदे म्हणाल्या.