मुंबईMLA Disqualification Hearing:सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार एका आठवड्यात आमदारांच्या आपात्रतेबाबतचा निपटारा करण्याबाबत प्रोग्राम तयार करण्यास सांगितले आहे. त्यानुसार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नव्याने शिवसेनेच्या 54 आमदारांना नोटीस बजावल्या असून सोमवारी दुपारी 3 वाजता सुनावणीसाठी हजर राहण्यास सांगितलं आहे. अपात्रतेबाबत सर्व याचिका एकत्र करून नोटीस बजावण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
तर गटप्रमुखांना बोलवणार:विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटले की, शिवसेनेच्या दोन्ही गटांना कागदपत्रं एकमेकांना देण्यासाठी वेळ देण्यात आला. त्यानुसार पुढील आठवड्यात नवीन सुनावणी होण्याबाबत संकेत दिले होते. सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आणि विधिमंडळाच्या कायद्याचा नियमाप्रमाणं दिरंगाई केली जाणार नाही. योग्य निर्णय घेतला जाईल. त्यासोबत घाईत निर्णय घेणार नसल्याचेही सांगायला विसरले नाही. नार्वेकर पुढे म्हणाले की, गरज पडल्यास शिवसेनेच्या दोन्ही गटांचे म्हणजे शिंदे गटाचे प्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना सुनावणीसाठी बोलवले जाऊ शकते. सोमवारी शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या 54 आमदारांना सुनावणीबाबतचे वेळापत्रक दिलं जाण्याची शक्यता आहे. वेळापत्रकानुसार दोन्ही गटांच्या आमदारांना सुनावणीला सामोरे जावे लागेल.