मुंबई : येत्या १९ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत असून विविध कामांचे भूमिपूजन करणार आहेत. आदित्य ठाकरे यांनी त्यापूर्वी पत्र लिहून, आघाडी सरकारच्या कामांचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप पत्रातून केला आहे.राज्यात सत्तांतर झाल्यापासून महाविकास आघाडी सरकारने मुंबईत गती दिलेले अनेक लोक हिताचे प्रकल्प रखडले आहेत.
आदित्य ठाकरेंचा सवाल :मुंबईत वाढती लोकसंख्या लक्षात घेता, पाणी टंचाई सामना करावा लागू नये, याकरिता पिण्याव्यतिरिक्त कामांसाठी सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते वापरात आणण्याचा मानस होता. ऑक्टोबर २०२२ पर्यंत या प्रकल्पाचे भूमिपूजन होणे अपेक्षित होते. तसेच खाऱ्या पाण्यावर प्रक्रिया करून २७९० एमएलडी पाणी वापरात आणले जाणार असून त्यापैकी ४०० एमएलडी पिण्यायोग्य पाणी मुंबईत येणार आहे. इस्त्राईलचे तंत्रज्ञान वापरून हा प्रकल्प तयार करण्यात येत आहे. मात्र राज्यात सत्तांतर होताच हे प्रकल्प रखडले आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून हे प्रकल्पांना गती का दिली नाही. कोणासाठी इतका उशीर का झाला ? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यासाठी लोकोपयोगी प्रकल्प रखडवले आहेत का? असा जाब ही विचारला आहे.
अजून भूमिपूजन नाही :आदित्य ठाकरे यांनी पत्रात विचारणा केली आहे की, मुंबईकरांच्या हिताचे पाण्यासंबंधीचे प्रकल्प का रखडले आहेत? आदित्य ठाकरे यांनी पुढे म्हटले आहे की, मुंबईतील वाढत्या लोकसंख्येमुळे वाढत्या पाण्याची आवश्यकताही भासत आहे. यावर मात करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या काळात अनेक चांगले निर्णय घेण्यात आले. मुंबई महापालिकेच्या वतीने ऑक्टोबर 2022 साली जलशुद्धीकरण प्रकल्प आणि 2023 मध्ये समुद्राच्या पाण्यापासून पिण्याचे पाणी तयार करणाऱ्या प्रकल्पाचे भूमिपूजन होणार होते. मात्र, या प्रकल्पांचे अद्याप भूमिपूजनही झालेले नाही.