मुंबई - राज्यात भाजपच्या काही विद्यमान खासदारांचा पत्ता कट होणार आहे. ज्या खासदारांच्या कामाबद्दल जनेतेमध्ये तीव्र नाराजी आहे, अशा लोकप्रतिनिधींना तिकिट न देता नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचे संकेत अर्थमंत्री सुधार मुनगंटीवार यांनी दिले आहेत.
भाजपच्या काही विद्यमान खासदारांचा पत्ता होणार कट, मुनगंटीवारांचे संकेत
ज्या खासदारांच्या कामाबद्दल जनेतेमध्ये तीव्र नाराजी आहे, अशा लोकप्रतिनिधींना तिकिट न देता नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचे संकेत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी पक्षाच्या कोअर कमिटीची तसेच निवडणूक व्यवस्थापन समितीची बैठक झाली. त्यानंतर मुनगंटीवार प्रसारमाध्यमांशी बोलत होते. दिल्लीत संसदीय कमिटीची बैठक होणार आहे. या बैठकीत उमेदवारांच्या अंतिम यादीवर चर्चा होणार आहे. त्यांनतर पहिली यादी जाहीर होणार असल्याचे मुनगंटीवार म्हणाले.
पक्षाने काही अंतर्गत सर्वे केले आहेत. या सर्वेनुसार ज्या विद्यमान खासदारांच्या कामाबद्दल जनतेत नाराजी असेल त्यांच्याबाबत पक्ष विचार करणार आहे. पण कार्यकर्ते आणि जनसंपर्क या घटकांचाही विचार होणार आहे. सध्या भाजप २५ जागांवर विचार करत असून मित्र पक्षांनाही यात सामावून घेता येईल. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचाही विचार घेण्यात येईल. मुंबईतमध्ये कोणत्याही जागांची अदलाबदली होणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. ईशान्य मुंबईत काही शिवसैनिकांचा संभाव्य भाजप उमेदवाराला विरोध असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, ती जागा बदलण्याचा पक्ष कोणताही विचार करत नसल्याचे मुनगंटीवार म्हणाले.