मुंबई -राज्यात महसूल जमा होण्यासाठी सध्या एक चांगले वातावरण निर्माण झाले आहे. यातूनच घर विकत घेण्यासाठी प्रक्रिया ही चांगल्या पद्धतीने सुरू असून कोरोनानंतर महसुलात मोठी घट झाली होती. पण, आता सरकारकडून अनेक प्रकारच्या सवलती देण्यात आल्याने महसूल वाढत आहे. यामुळे महसुली अर्थव्यवस्था राज्यात गतिमान होण्यासाठी काही वेळ लागेल, अशी माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.
परतीच्या पावसाने राज्यात चार ते पाच जिल्ह्यांमध्ये शेती पिकांना व शेतीला मोठा फटका बसला आहे. त्यामध्ये उस्मानाबाद, सोलापूर, सांगली आणि पुणे जिल्ह्याचा काही भाग आहे. अनेक ठिकाणी शेतजमिनी वाहून गेल्या आहेत. तर शेती पिकांचेही बरेच मोठे नुकसान झाले आहे. काही जिल्ह्यात पिकांसोबतच जमिनीही खरडून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकार म्हणून आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहोत. स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेसुद्धा शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन नुकसानीची पाहणी करत आहेत. शेतकऱ्यांना भेटून दिलासाही देत आहेत, असे थोरात सांगितले.