महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

LIVE : धनंजय मुंडे यांना तूर्तास अभय; पक्षाकडून केली जातेय पाठराखण

मुंडे
मुंडे

By

Published : Jan 14, 2021, 3:23 PM IST

Updated : Jan 14, 2021, 7:18 PM IST

17:26 January 14

अजूनही पोलिसांनी 'एफआयआर' दाखल केलेली नाही; तक्रारदाराच्या वकिलाची माहिती

तक्रारदार रेणु शर्मा यांच्या वकिलांनी दिलेली माहिती

मुंबई- पोलिसांनी रेणू शर्मा यांना माध्यमांशी टाळत मागील दाराने बाहेर काढले. आम्हाला पोलीस सहकार्य करत नाहीत, तक्रारदाराचे अर्धेच म्हणणे (स्टेटमेंट) दाखल करून घेतले असून उद्या 11 वाजता पुन्हा म्हणणे दाखल करण्यासाठी बोलावले आहे. या प्रकरणाला ४ दिवस होऊनही अद्याप पोलिसांनी प्राथमिक तक्रार (एफआयआर) दाखल करून घेतलेली नाही. याविरोधात आम्ही न्यायालयात जाऊ, मंत्री धनंजय मुंडे या प्रकरणात तक्रारदार यांच्यावर दबाव टाकत आहेत, असे रेणु शर्मा यांचे वकील रमेश त्रिपाठी यांनी सांगितले.

रेणू विरुद्ध खोट्या केस केल्या जात आहेत. माझ्या ताकदीची तुम्हाला कल्पना नाही, बहिणीला केस मागे घ्यायला सांग, नाही तर सगळ्या कुटुंबाला खंडणी प्रकरणात अडकवू असे धंनजय मुंडे यांनी करुणा शर्मा यांना धमकावले, असल्याचेही वकिलांनी सांगितले.

17:19 January 14

धनंजय मुंडे यांना तूर्तास अभय; पक्षाकडून केली जातेय पाठराखण

मुंबई

मुंबई- सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर करण्यात येत असलेले आरोप हे गंभीर आहेत, परंतु यासंदर्भात पोलीस चौकशीत जे काही स्पष्ट होईल, त्यानंतरच मुंडे यांच्यावरील कारवाईचा विषय समोर येईल. मात्र, केवळ आरोप केले म्हणून त्यांच्यावर कारवाई करणे अपेक्षित नाही, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुंडे यांच्यावर पक्षाकडून कारवाई करण्यास नकार दिला आहे. यामुळे तूर्तास मुंडे यांना अभय मिळणार असून पक्षाकडूनही पाठराखण केली जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

मागील दोन दिवसांपासून लैंगिक अत्याचाराच्या विषयावर चर्चेत आलेल्या सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना तूर्तास पक्षाकडून अभय देण्याची भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. त्यामुळे मुंडे यांच्यावर कोणतीही कारवाई पक्षाकडून केली जाणार नसल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली. 

जयंत पाटील म्हणाले की, मुंडे यांच्यावर जे काही आरोप करण्यात येत आहेत, त्यासंदर्भात पोलिसांनी चौकशी करावी, आम्ही पोलिसांच्या चौकशीला सर्व प्रकारची मदत करू. मात्र, केवळ आरोप होत आहेत म्हणून एखाद्यावर कारवाई करणे योग्य नाही. दरम्यान, मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना आपली सर्व बाजू प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटून सर्व माहिती दिली असल्याचे स्पष्ट केले. तसेच आपल्यावर पक्षश्रेष्ठी आणि पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे जो निर्णय घेतील तो निर्णय आपल्याला मान्य असल्याचेही मुंडे यांनी स्पष्ट केले. 

मुंडे यांचे प्रकरण समजून घेण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य कार्यालयात सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची महत्त्वाची बैठक पार पडली. त्यानंतर मुंडे यांच्यासोबत जयंत पाटील यांनी एक बैठक घेऊन मुंडे यांची संपूर्ण बाजू ऐकून घेतली आणि त्यानंतर माध्यमांशी बोलताना मुंडेंवर पक्षाकडून कोणती कारवाई केली जाणार नाही, असे स्पष्ट केले. यामुळे मागील दोन दिवसांपासून मुंडेंवर केल्या जात असलेल्या लैंगिक अत्याचारांच्या आरोपांसंदर्भात मुंडेची पक्षाकडून पाठराखण करण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

16:11 January 14

शरद पवार आणि पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील तो अंतिम असेल - मुंडे

मुंबई- आपल्या विरोधात सध्याचे प्रकरण सुरू आहे. त्यासंदर्भात मी कालच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन त्यासाठीची सर्व माहिती मी त्यांना दिली आहे. त्यामुळे माझ्या या प्रकरणात पवार साहेब आणि पक्ष जो निर्णय घेतील तो आपल्याला मान्य असेल, असा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी आज मुंबईत केला. मागील दोन दिवसांपासून मुंडे यांच्यावर लैंगिक अत्याचारासंदर्भात वाद सुरू झाला असून त्या पार्श्वभूमीवर आज त्यांनी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. 

बॅलार्ड पियर येथे असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात जनता दरबारला उपस्थित राहण्यासाठी आले होते. त्या दरम्यान त्यांनी माध्यमांशी बोलताना आपण निर्दोष असून आपल्यावर जाणीवपूर्वक फसवणूक केली जात असल्याचा दावाही त्यांनी केला. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात आज सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत एक महत्त्वाची बैठक पार पडली. त्या बैठकीमध्ये धनंजय मुंडे यांच्या विषयावर पक्षाकडून घेण्यात येणाऱ्या निर्णयासंदर्भात दीर्घ चर्चा झाली असल्याचे सांगण्यात येते. मात्र, मुंडे यांची बाजू ऐकून घेतल्यानंतरच त्याविषयी पक्षाकडून आज सायंकाळपर्यंत निर्णय जाहीर केला जाण्याची शक्यता राष्ट्रवादीच्या एका वरिष्ठ सूत्रांकडून देण्यात आली. 

मुंडे यांचे प्रकरण गंभीर असल्याचे वक्तव्य सकाळी माध्यमांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केल्याने हे प्रकरण अधिकच गुंतागुंतीचे बनण्याची शक्यताही एकीकडे वर्तवली जात आहे. तर दुसरीकडे मुंडे यांच्या पाठीशी पक्ष भक्कमपणे उभा राहणार असल्याने मुंडे यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच उद्भवणार नाही, अशी शक्यता राष्ट्रवादीच्या एका वरिष्ठ सूत्रांकडून व्यक्त करण्यात आली

15:45 January 14

LIVE : मुंडेंवर आरोप करणाऱ्या महिलेच्या विरोधात भाजप नेत्याची तक्रार

भाजप नेत्याची तक्रार

मुंबई- मंत्री धनंजय मुंडेंवर आरोप करणाऱ्या महिलेच्या विरोधात भाजप नेते कृष्णा हेगडे यांनी आंबोली पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. कृष्णा हेगडे यांनाही या महिलेने मेसेज, फोन करून त्रास दिल्याचा आरोप केला आहे. धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप आणि कृष्णा हेगडे यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. 

दरम्यान, धनंजय मुंडे यांच्यासोबत माझा कुठलाही संबंध नसून 2010 पासून सदर रेणु शर्मा नावाची महिला मला सतत फोन करून माझ्यासोबत संबंध ठेवण्यासाठी बळजबरी करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या महिलेला बॉलिवूडमध्ये गायिका म्हणून नाव कमवायचे होते. त्यासाठी ती माझी मदत घेण्यासाठी सतत मला फोन करून संबंध ठेवण्यासाठी सांगत होती. 6 जानेवारी 2020 रोजीसुद्धा या महिलेने संपर्क करून यासंदर्भात संबंध ठेवण्यासाठी तगादा लावला होता. दरम्यान, आपण आंबोली पोलीस ठाण्यामध्ये जाऊन तक्रार देत असल्याचे हेगडे यांनी स्पष्ट केले आहे.

15:38 January 14

लैंगिक शोषणाच्या आरोपानंतर मंत्री धनंजय मुंडे आज जनता दरबारसाठी उपस्थित होते

मंत्री धनंजय मुंडे यांचा जनता दरबार

15:35 January 14

मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप गंभीर स्वरुपाचे - शरद पवार

शरद पवार यांची प्रतिक्रिया

मुंबई- सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप हे गंभीर स्वरूपाचे आहे. याचा पक्ष म्हणून निश्चित विचार करावा लागेल, असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. मुंडे यांच्यावर एका महिलेने लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे.

15:01 January 14

मुख्यमंत्री बंगले लपवतात, त्यांचे मंत्री महिलांशी असलेले संबंध लपवतात - सोमैय्या

भाजप नेते किरीट सोमैय्या

मुंबई- निवडणूक आयोगाकडे भाजप नेते किरीट सोमैय्या यांनी जाऊन तक्रार नोंदवली आहे. या प्रकरणातील आरोप करणारी पीडित महिलाही सोमैय्या यांच्यासोबत डी. एन. नगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवण्यात दाखल झाली होती. सदरच्या पीडित महिलेने आरोप केलेला आहे की, 2003 पासून धनंजय मुंडेंनी शारीरिक संबंध ठेवले आहेत. शारीरिक संबंध ठेवण्यासाठी बॉलिवूडमध्ये चित्रपटात गायक होण्यासाठी मदत करू, असे आश्वासन सुद्धा धनंजय मुंडे यांनी पीडित महिलेला दिला असल्याचा दावा या महिलेने केलेला आहे.

Last Updated : Jan 14, 2021, 7:18 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details