मुंबई -लोकसभेत कृषी विधेयकाला पाठिंबा देऊन राज्यसभेत शिवसेनेने सभात्याग का केला हा प्रश्न शिवसेनेलाच विचारा, राज्यात आम्ही एकत्र आहोत त्याचपद्धतीने केंद्रातही आम्ही एकत्र असायला हवे होते, अशी प्रतिक्रिया सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी आज (दि. 21 सप्टें.) दिली.
बोलताना मंत्री अशोक चव्हाण मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आज चव्हाण यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली. मराठा आरक्षणाच्या संदर्भात आम्ही कायदेशीर मुद्दे काय आहेत, याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा केली होती. नेमकी ही चर्चा काय होती, त्याची माहिती आज आम्ही शरद पवारांना दिली असून त्यांनी त्यांचे मत मांडले असल्याचे अशोक चव्हाण म्हणाले. मराठा आरक्षणाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात पुन्हा आम्ही जाण्याची तयारी सुरू केली असून त्यासंदर्भात या बैठकीत चर्चा झाली असल्याचेही चव्हाण म्हणाले. न्यायालयात लवकरच घटनापीठ स्थापन व्हावे यासाठी आपण मुख्य न्यायमूर्तीकडे या आरक्षणाचा प्रस्ताव घेऊन जात असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्रातील कृषी धोरणासंदर्भात चव्हाण म्हणाले की, शेतकऱ्यांची गळचेपी होते आणि मध्यस्थांच्या फायदा होतो. त्यामुळे या विधेयकाला काँग्रेसचा विरोधच आहे. मात्र, अशा स्थितीत शेतकरी हितासाठी काँग्रेस लढत राहील. शेतकऱ्यांसाठी सगळ्यांनी एकत्र येऊन शेतकऱ्यांचे हात मजबूत केले पाहिजेत, असे आवाहनही त्यांनी केले. मराठा आरक्षणाच्या संदर्भात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सरकारवर केलेल्या टीकेवर चव्हाण म्हणाले की, चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट करावे की, कोणत्या नेत्यांना मराठा आरक्षण नको आहे. त्यामुळे वेगवेगळे विधाने टाळून भाजपाच्या नेत्यांनी एक वाक्यता आणली पाहिजे, असे ते म्हणाले. मुंबईत लोकल सेवा सुरु करण्यासंदर्भात विचारले असता ते मंत्री अशोक चव्हाण म्हणाले की, लोकल सेवा सुरू करायची की बंद ठेवायचे आहेत याचा निर्णय परिस्थितीचा विचार करून घेतला जाईल.