मुंबई :राज्याचे परिवहन मंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांना ईडीने नोटीस बजावली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करून ही माहिती दिली.
नोटीशीला कायदेशीर उत्तर देऊ
तर, 'ईडीने १०० कोटींच्या कथित वसुलीसंदर्भात नोटीस बजावली आहे. मंगळवारी (31 ऑगस्ट) सकाळी ११ वाजता ईडीच्या मुंबईच्या कार्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे. या नोटिशीला आम्ही कायदेशीर उत्तर देऊ', असे परब यांनी म्हटले आहे.
नोटीशीत कोणत्याही प्रकरणाचा उल्लेख नाही - परब
'आज संध्याकाळी मला ईडीची नोटीस मिळाली आहे. त्यात कोणत्याही प्रकरणाचा उल्लेख केलेला नाही. त्यामुळे नोटीस कशासी संबंधित आहे? हे मला सांगता येणार नाही. जोपर्यंत प्रकरण कळत नाही, तोपर्यंत काहीही सांगणं कठीण आहे. नोटीशीमध्ये फक्त इन्व्हेस्टीगेशनचा पार्ट असल्याचा उल्लेख केला आहे. नोटीसला आम्ही कायदेशीर पद्धतीने उत्तर देऊ. मला कारणं कळली पाहिजे. मी या प्रक्रियेवर कायदेशीर पद्धतीने अभ्यास करुन ईडी चौकशीला सामोरं जाण्याबद्दल निर्णय घेईन. नोटीस कायदेशीर आलेली आहे, त्याला कायदेशीर उत्तर दिलं जाईल. नोटीशी मागचं कारण काय हे जेव्हा समजेल तेव्हा आम्ही उत्तर देऊ', असे परब यांनी म्हटले आहे.