मुंबई - नवी दिल्ली येथील नवीन महाराष्ट्र सदनासंदर्भात शुक्रवारी राज्याचे राजशिष्टाचारमंत्री आदित्य ठाकरे यांनी आढावा घेतला. विशेषत: सदनामधील आहार व्यवस्थेमध्ये सुधारणा करणे, महाराष्ट्रीय खाद्यपदार्थांना चालना देणे, महाराष्ट्राची संस्कृती दर्शविणारे संग्रहालय उभारणे आणि खासदार, दिल्लीतील महाराष्ट्रीय अधिकारी, यूपीएससीचा अभ्यास करणारे राज्यातील विद्यार्थी यांच्यासाठी ग्रंथालय, ई-लायब्ररीसारख्या सोयी-सुविधा निर्माण करणे याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. बैठकीस खासदार अरविंद सावंत, महाराष्ट्र सदनचे निवासी आयुक्त श्यामलाल गोयल हे ऑलनाईन प्रणालीद्वारे सहभागी झाले. राजशिष्टाचार विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर यावेळी उपस्थित होत्या.
नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनाचा आदित्य ठाकरे यांनी घेतला आढावा - नवीन महाराष्ट्र सदन
दिल्लीमधील नवीन महाराष्ट्र सदनाचा राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी आढावा घेतला. तसेच महाराष्ट्राची संस्कृती दर्शविणारी संग्रहालय निर्माण करावी, या सदनात ग्रंथालय, ई लायब्ररीच्या सोयी-सुविधा निर्माण कराव्यात, अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना आदित्य ठाकरे यांनी केल्या आहेत.
खासदार अरविंद सावंत यांनी महाराष्ट्र सदनामधील जेवणाची व्यवस्था तसेच तेथील सोयी-सुविधांबद्दल काही समस्या मांडल्या. याची दखल घेत मंत्री ठाकरे यांनी यामध्ये व्यापक सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या. महाराष्ट्र सदनातील आहार व्यवस्था उत्कृष्ट असावी. तसेच तेथे विशेष करुन महाराष्ट्रीय खाद्यपदार्थांना प्रोत्साहन देण्यात यावे. त्याद्वारे दिल्लीतील इतर राज्यातील लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी यांना महाराष्ट्रीय खाद्यपदार्थांविषयी माहिती होऊन त्याला चालना मिळेल.
सदनामध्ये महाराष्ट्राची संस्कृती दर्शविणारे संग्रहालय उभारण्यासंदर्भात आपण राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री यांच्यासमवेत चर्चा करु असे सांगितले. त्याचबरोबर सदनामध्ये ग्रंथालय, ई-लायब्ररी आदींचाही विकास करण्यात यावा, अशा सूचना मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिल्या.