मुंबई- तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा मुंबईला बसला आहे. सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. ही परिस्थिती सुधारण्यास अवधी लागेल, असे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले. सोमवारी (दि. 17 मे) मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील आपत्कालीन विभागातून परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर प्रसार माध्यमांशी ते बोलत होते.
अरबी समुद्रात आलेल्या तौक्ते चक्रीवादळाचा फटका मुंबईला बसला. सकाळपासून सुरू जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. परिणामी सखल भाग जलमय झाले होते. अनेक भागात झाडे उन्मळून पडल्याने वाहतूक कोंडी झाली. या पार्श्वभूमीवर पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे हे मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन विभागाला भेट देऊन मुंबईतील परिस्थितीचा आढावा घेतला. महापालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांच्यासह चार अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, सहायक आयुक्त, स्थायी समिती अध्यक्ष यांच्यासह अन्य अधिकारी यावेळी उपस्थित होते.
गुजरातच्या दिशेने वादळ निघाले आहे. पण, वाऱ्याचा वेग प्रंचड आहे. संध्याकाळ किंवा रात्रीपर्यंत तीव्रता कायम राहील. महापालिकेने यामुळे सतर्क राहावे, मनुष्यहानी होणार नाही, याबाबत काळजी घ्यावी, अशा सूचना ठाकरे यांनी केल्या. तसेच विनाकारण मुंबईकरांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन ठाकरे यांनी केले. मुंबईत कधीही न पाहिलेले चक्रीवादळ असल्याचे ठाकरे म्हणाले.
मुख्यमंत्री, पंतप्रधानांमध्ये चर्चा
चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात चर्चा झाली. राज्यभरातील परिस्थिती माहिती मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना दिल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. केंद्र आणि राज्य शासन एकमेकांशी समन्वय साधून सर्वजण मिळून काम करत असल्याचे ठाकरे म्हणाले.