मुंबई - आगामी लोकसभा निवडणुकांपूर्वी अनेक घोषणा सरकरातर्फे करण्यात येत आहेत. मात्र, दूधदरवाढीचा विषय मागे पडला आहे. १ फेब्रुवारीपासून शेतकऱ्यांचे अनुदान बंद करण्यात आले आहे. हे अनुदान पूर्ववत करून ५ रुपये भाववाढ करण्यात यावी, अशी मागणी दुध उत्पादक कल्याणकारी संघाने केली आहे.
दूध दरवाढ केली नाही, तर दूध उत्पादकावर आत्महत्या करण्याची वेळ येईल, असे दुध संघाने म्हटले आहे. सरकार भाववाढीच्या बाबतीत धरसोडपणा करत आहे, असा आरोपही त्यांनी केला. तेव्हा सरकारने यात लक्ष घालावे. हा व्यवसाय जीवंत ठेवण्यासाठी त्वरीत उपाययोजना कराव्यात, अशी मागणी गुलाबराव डेरे यांनी केली.
जनावरांच्या चाऱ्याचे आणि पशुखाद्याचे भाव गगनाला भिडले आहेत. पण, दुधाचे भाव वाढवण्यात येत नाहीत. प्रथम २७ रुपये लिटर प्रमाणे भाव देण्यात आला नंतर पंचवीस रुपये लिटर भाव करण्यात आला आता तर १८ ते २० रुपये करण्यात आला. उलट दरवाढ करण्याऐवजी दरकपात करण्यात आलेली आहे. दुधाला प्रती लिटर ३० रुपये भाव असावा, अशी मागणी करण्याता आली आहे.
शासन निर्णयाप्रमाणे ३.५ फॅट व ८.३ एसएनएफ असलेल्या दुधास २६ रुपये दहा पैसे असा भाव होता. शासनाने दूध स्वीकृतीसाठी ३.२ व ८.३ एसएनएफ असलेले दूध स्वीकारण्यास मान्यता दिली. म्हणजेच दूध स्वीकृतीसाठी मान्यता दिलेले दूध योग्यच असल्याने दोन्ही भावात तफावत असली पाहिजे. परंतु प्रत्येक पॉइंटला एक रुपया कमी करून शेतकऱ्यांवर अन्याय केलेला आहे. प्रत्येक लिटरमागे शेतकऱ्याचा दोन रुपये तोटा केलेला आहे, असे दुध संघाने सांगितले.