मुंबई -माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज दूध दरवाढीसाठी राज्यात दूध बंद आंदोलनाची हाक दिली आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत असताना पाहायला मिळत आहे. आज एक दिवस राज्यातील सर्व दूध संकलन बंद करण्याचे शेट्टी यांनी आवाहन केले होते. त्यानुसार राज्यभरातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी पाठिंबा देत दूध बंद आंदोलनात सहभाग नोंदवला आहे, तर काही ठिकाणी इशारा देऊन दूध संकलन केलेल्या दुधाचे टँकर फोडण्यात आले आहे.
कोल्हापूर - जिल्ह्यातील नांदणी येथे काळ भैरवनाथाला दूग्धाभिषेक घालून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आजच्या आंदोलनाला सुरुवात केली. शिवाय गावातल्या एकाही व्यक्तीने दूध डेअरीमध्ये न घालता गावातीलच गोरगरीब लोकांना वाटत आंदोलनाला पाठिंबा दिला. स्वाभिमानी संघटनेचे दूध दरवाढीसाठी आज राज्यव्यापी दूध बंद आंदोलन आहे. त्याला जिल्हाभरातून चांगला प्रतिसाद मिळताना पाहायला मिळत आहे.
बीड - राज्यातील दुग्ध व्यवसाय संकटात सापडला आहे. शासनाने तात्काळ प्रति लिटर मागे 5 रुपये तात्काळ भाववाढ करावी अशी मागणी करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी सकाळी बीड बायपास मार्गावर दुधाचा टँकर अडवून भररस्त्यावर दुधाच्या टँकरच्या टायरमधील हवा सोडली. याशिवाय बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यामधील गोविंदवाडी येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पूजा मोरे यांनी मुख्यमंत्र्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून सरकारविरोधातील रोष व्यक्त केला.
येवला (नाशिक) -न्याहारखेडे गावात दूध दरवाढ संदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष श्रावण देवरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले असून यावेळी दूध रस्त्यावर न फेकता गावातील गोर-गरिब गरजूंना ते वाटप करण्यात येऊन दूध दरवाढ त्वरीत करावी, अशी मागणी यावेळी दूध उत्पादकांनी केली आहे. मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष श्रावण देवरे यांनी केले.
सोलापूर -पंढरपुर तालुक्यातील खेडभोसे, तर माळशिरस तालुक्यात वेळापूर, खंडाळी येथे स्वाभिमानीच्या कार्यकर्त्याकडून पहाटेच्या सुमारास टँकरमधील दूध रस्त्यावर सोडून काही ठिकाणी दुधाच्या पिशव्या रस्त्यावर टाकून आपला रोष व्यक्त केला. दरम्यान, कोरोना विषाणूचा वाढत संसर्ग पाहता सर्व नियमांचे पालन करून हे आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणा दिल्या.
लातूर -दिवसेंदिवस दुधाचे दर घसरत आहेत. त्यासाठी आज राज्यभर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन केले जात आहे. लातूर जिल्ह्यातील तांदुळजा येथील ग्रामदैवत निलकंटेश्वराला दुग्धाभिषेक घालून रोष व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे योग्य दराबाबत आठ दिवसांत निर्णय झाला नाही तर वेगळ्या पद्धतीने आंदोलन छेडले जाणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.
सोलापूर -गायीच्या दूधाला 25 रूपये प्रतिलिटर दर आणि 5 रूपये अनुदान देण्याच्या मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्ह्यात आंदोलन करण्यात आले. जिल्ह्याच्या विविध ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला दूधाचा अभिषेक घालून आंदोलनाला सुरुवात केली.