मुंबई Who is Milind Deora : आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीला मोठा धक्का बसलाय. कारण दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघावरुन मविआतील शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात धुसफूस सुरू होती. एकीकडं ठाकरे गटाकडून दक्षिण मुंबई मतदारसंघावर वारंवार दावा सांगण्यात येत होता. दुसरीकडं ठाकरे गटाच्या या दाव्यामुळं काँग्रेसचे दिग्गज नेते दक्षिण मुंबईतील एक बडा चेहरा असलेले माजी मंत्री मिलिंद देवरा हे नाराज होते. यामुळं ते शिंदे गटाच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरू होत्या. अशातच त्यांनी आज आपल्या कॉंग्रेस सदस्यत्त्वाचा राजीनामा दिल्यानं काँग्रेसला मोठा धक्का बसलाय. यानंतर ते आजच दुपारी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत त्यांच्या पक्षात प्रवेश करणार आहेत.
कोण आहेत मिलिंद देवरा :मिलिंद देवरा हे मुंबई काँग्रेसमधील एक मोठं नाव आहे. त्यांचा जन्म 4 डिसेंबर 1976 रोजी झाला. त्यांचे वडील मुरली देवरा हे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते होते. वडिलांनंतर कॉंग्रेसमधील प्रबळ नेते आणि दक्षिण मुंबईतील काँग्रेसचा सुसंस्कृत आणि सुशिक्षित चेहरा अशी ओळख मिलिंद देवरांनी निर्माण केली होती. 15 व्या लोकसभेतील म्हणजेच 2004 च्या लोकसभा निवडणुकीत मिलिंद देवरा सर्वात तरुण सदस्य म्हणून निवडून आले होते. ते वयाच्या अवघ्या 27व्या वर्षी खासदार झाले. त्यांनी भाजपाच्या जयवंतीबेन मेहता यांचा 10 हजार मतांनी पराभव केला होता. यानंतर 2009 च्या निवडणुकीतही ते दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर 2014 च्या निवडणुकीत शिवसेनेच्या अरविंद सावंतांकडून त्यांना पराभव स्विकारावा लागला होता.
दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाची राजकीय स्थिती काय? :दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात एकूण सहा विधानसभांचा समावेश आहे. यात वरळीतून आदित्य ठाकरे (ठाकरे गट आमदार), शिवडी अजय चौधरी (ठाकरे गट आमदार), भायखळा यामिनी जाधव (शिंदे गट आमदार), मलबार हिल मंगल प्रभात लोढा (भाजपा आमदार), कुलाबा राहुल नार्वेकर (भाजपा आमदार) आणि मुंबादेवी अमीन पटेल (काँग्रेस आमदार) असं पक्षीय बलाबल दक्षिण मुंबई मतदारसंघात आहे. त्यातच आता शिवसेना दोन गटांत विभागली गेलीय. त्यामुळं मिलिंद देवरांनी जर शिंदे गटात प्रवेश केला, तर त्यांच्यासाठी ते नक्कीच फायद्याचं ठरण्याची शक्यता आहे.