मुंबई Milind Deora : मुंबई काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांनी रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. त्यांच्यासोबत 10 माजी नगरसेवक, 20 पदाधिकारी, 15 महत्त्वपूर्ण व्यापारी संघटनांचे अध्यक्ष आणि सुमारे 450 कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला.
काँग्रेसशी 55 वर्षांचं नातं संपुष्टात : दक्षिण मुंबईतील लोकसभेचे माजी खासदार देवरा यांनी रविवारी 'X' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिलं, "आज माझ्या राजकीय प्रवासातील महत्त्वाच्या अध्यायाचा अंत झाला. मी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून यासोबतच माझ्या कुटुंबाचं पक्षाशी असलेलं 55 वर्षांचं नातं संपुष्टात आलं. मी सर्व नेते, सहकारी आणि कार्यकर्त्यांचा वर्षानुवर्षे अखंड पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचा आभारी आहे". "एकनाथ शिंदे यांना मुंबई आणि महाराष्ट्राच्या हितासाठी काम करणारी चांगली लोक हवी आहेत. खासदार होऊन मी या व्हिजनचं उत्तम प्रतिनिधित्व करू शकतो, असं एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांना वाटतं. त्यांचं समर्थन आणि विश्वासाबद्दल मी आभार व्यक्त करतो", असं मिलिंद देवरा यावेळी म्हणाले.
देवरा विरुद्ध सावंत : विशेष म्हणजे, मिलिंद देवरा यांच्यासोबत शिवसेनेत प्रवेश करणारे बहुतेक नेते आणि पदाधिकारी हिंदी भाषिक आहेत. गेल्या 2 लोकसभा निवडणुकांमध्ये देवरा यांना शिवसेनेच्या अरविंद सावंत यांच्याकडून पराभव पत्कारावा लागला होता. आता आगामी निवडणुकीतही देवरा विरुद्ध सावंत अशी लढत होण्याची शक्यता आहे. अरविंद सावंत यांना दक्षिण मुंबईतील मराठी मतांचं समर्थन आहे. मात्र येत्या निवडणुकांमध्ये येथून मनसेचे बाळा नांदगावकर निवडणूक लढवतील अशा चर्चा आहेत. अशा परिस्थितीत मराठी मतांचं विभाजन झालं तर त्याचा फायदा मिलिंद देवरांना मिळू शकतो.