मुंबई- कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देश 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्याचा निर्णय केंद्र सरकारने मंगळवारी घेतला. त्यामुळे महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) सेलच्या वतीने घेण्यात येणारी एमएचटी सीईटी प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.
हेही वाचा-''गावाकडच्या लोकांनी कायदा हातात घेऊ नये, पोलिसांना त्यांचे काम करू द्या''
राज्यात ही परीक्षा तब्बल 9 दिवस 18 शिप्टमध्ये 13 एप्रिलपासून सुरू होणार होती. एमएचटी सीईटी परीक्षेला तब्बल 5 लाखांहून अधिक विद्यार्थी बसणार होते. एप्रिलच्या दुसर्या आठवड्यात म्हणजे 13 ते 17 एप्रिल दरम्यान आणि 20 ते 23 एप्रिल दरम्यान 9 दिवसांच्या काळात 18 सत्रात परिक्षा होणार होती. राज्यातील अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एमएचटी-सीईटी घेण्यात येते.
दरवर्षी पेक्षा यंदा या परीक्षेला 1 लाख 11 हजार 613 विद्यार्थ्यांची वाढ झाली आहे. तर 16 हजार 962 राज्याबाहेरचे विद्यार्थी परिक्षा देणारे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे आता ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. या परीक्षेला विषयानुसार पीसीएम(भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित) 2 लाख 48 हजार 661 विद्यार्थी बसणार आहेत. तर पीसीबी (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र) 2 लाख 76 हजार 246 असे एकूण 5 लाख 24 हजार 907 विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत, अशी माहिती सी सेलकडून देण्यात आली.