मुंबई - शासनाने गिरण्या बंद झाल्यानंतर बेरोजगार झालेल्या गिरणी कामगारांना म्हाडाच्या ३ हजार ८०० घरांची सोडत काढण्याच्या निर्णय घेतला आहे. ही सोडत ऑगस्टमध्ये काढण्यात येणार असल्याची माहिती म्हाडा अध्यक्ष उदय सामंत यांनी दिली. गिरणी कामगारांना माफक किंमतीमध्ये घरे मिळावे हे उदिष्ट असल्याचे सामंत म्हणाले. म्हाडाच्या मुंबईतील २१७ घरांची सोडत रविवारी काढली गेली, या कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते.
मुंबईत गिरणी कामगारांसाठी म्हाडाच्या ३८०० घरांची ऑगस्टमध्ये सोडत - homes
शासनाने गिरण्या बंद झाल्यानंतर बेरोजगार झालेल्या गिरणी कामगारांना म्हाडाच्या ३ हजार ८०० घरांची सोडत काढण्याच्या निर्णय घेतला आहे. ही सोडत ऑगस्टमध्ये काढण्यात येणार असल्याची माहिती म्हाडा अध्यक्ष उदय सामंत यांनी दिली.
लोअर परेल सेनापती बापट मार्ग येथील श्रीनिवास मिल आणि वडाळा येथील बॉम्बे डाईंग मिल या दोन्ही मिलच्या जागांवर गिरणी कामगारांसाठी घरे बांधण्यात आली आहेत. या घरापैकी ३ हजार ८०० घरांची सोडत ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात काढण्यात येणार आहे. याबद्दलचे काही काम बाकी आहे, ती पूर्ण झाल्यानंतर सोडत काढण्यात येणार आहे. म्हाडाने गिरणी कामगारांना घरे देण्यासाठी आणलेली योजना ही खूप धीम्या गतीने सुरू असल्याचे कामगारांचे म्हणणे आहे.
एकूण १ लाख ७५ हजार गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांनी म्हाडाच्या घरांसाठी अर्ज दाखल केले आहेत. त्यामधील सुमारे १२ हजार गिरणी कामगारांना घरे लॉटरीमध्ये जाहीर झाली आहेत. त्यातील बहुतांश जणांची प्रक्रिया अद्याप सुरू असल्याने त्यांना या घरांचा ताबा अद्याप मिळालेला नाही.