मुंबई- कोरोना काळात मुंबईतील पायाभूत सुविधा प्रकल्प रखडल्याने अनेक प्रकल्पांची डेडलाइन चुकणार असे म्हटले जात आहे. असे असताना मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) च्या मेट्रो २ अ (दहीसर ते डीएन नगर) आणि मेट्रो ७ (दहीसर पूर्व ते अंधेरी पूर्व) मार्गाचाही मुहूर्त चुकला आहे. पण हा मुहूर्त केवळ ६ महिने पुढे गेल्याचे म्हणत एमएमआरडीएने हे दोन्ही मार्ग मे २०२१ मध्ये मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार असल्याची घोषणा केली आहे. यामुळे येणाऱ्या वर्षात मुंबईकरांचा प्रवास आणखी सुकर आणि वेगवान, तसेच गारेगार होणार आहे.
मुंबईत आंतरराष्ट्रीय दर्जाची वाहतूक व्यवस्था निर्माण करण्यासाठी एमएमआरडीएने मेट्रोचे जाळे विणण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार मेट्रो १ याआधीच सेवेत दाखल झाली आहे. तर आता अनेक मेट्रो मार्गाचे काम वेगात सुरू आहे. दरम्यान, कोरोना लॉकडाऊनमुळे या कामाला ब्रेक लागला आहे. मजूर नसल्याने आणि काही काळ काम बंद होते, त्यामुळे नक्कीच प्रकल्पास विलंब होणार असल्याचे म्हटले जात आहे. पण, एमएमआरडीएने मात्र आपल्या प्रकल्पावर तितकासा परिणाम झाला नसल्याचे स्पष्ट केले आहे. उलट सर्व प्रकल्पांच्या कामांनी वेग घेतल्याची माहिती आयुक्त आर.ए राजीव यांनी आज दिली.