मुंबई -सर्वोच्च न्यायालयाने आज निकाल न देता काही महत्वपूर्ण निरीक्षणे महाराष्ट्रातील ठाकरे-शिंदे सत्तासंघर्षासंदर्भात नोंदली. राज्यातील या सत्तासंघर्षात राज्यपाल, निवडणूक आयोगासह महत्वाच्या घटकांनी घेतलेल्या निर्णयांवर कडक ताशेरे ओढले आहेत. त्याचवेळी कोणताही निर्णय न दिल्याने सरकारला सध्या तरी कायदेशीरदृष्ट्या कोणताही धोका नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्याने नंतर ज्या काही घटना घडल्या, त्याबाबत कोर्टाला आताच काही निर्णय देता येणार नसल्याचे स्पष्ट केले. या एकूणच परिस्थितीत ट्विटर, इन्स्टाग्राम, फेसबुक अशा समाज माध्यांच्यावर प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे. त्यातील काही मासलेवाईक प्रतिक्रिया आपण येथे पाहणार आहोत.
या मीम्समध्ये सध्या गाजत असलेले एक मीम म्हणजे, 'शिंदे क्लिन बोल्ड, पण ठाकरेंचा नो बॉल' हे सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. विश्वासदर्शक ठरावाला सामोरे न जाताच उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्याच्या कृतीवर बोट ठेवणारे हे मीम खूपच गाजत आहे. कारण कोर्टाने शिंदे गटासंदर्भात अनेक धक्कादायक निरीक्षणे नोंदवली. त्यामध्ये त्यांची स्वतःची गटनेतेपदी स्वतःच केलेली नियुक्ती, पक्षप्रतोदपदी केलेली भरत गोगावले यांची नियुक्ती, राज्यपालांचा बहुमत सिद्ध करण्यासाठी अधिवेशन बोलावण्याचा निर्णय या गोष्टी चुकीच्या पद्धतीने घडल्या असल्याचे कोर्टाने नमूद केले आहे. मात्र उद्धव ठाकरे यांनी अवसानघातकी निर्णय घेऊन मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याने त्यांचा हाच निर्णय 'नो बॉल' ठरवत नेमके वर्मावर बोट ठेवणारे हे मीम परिस्थितीला चांगलेच चपखलपणे बसणारे असल्याने गाजत आहे.
याचबरोबर कोर्टाच्या निरीक्षणांच्या अनुषंगाने आणखी एक मीम सध्या सोशल मीडियावर खूपच गाजत आहे. त्यामध्ये खालील मीमने सोशल मिडीयावर चौफेर फटकेबाजी सुरू केल्याचे दिसत आहे.
मुलगी बघण्याचा कार्यक्रम बेकायदेशीर.
एकमेकांची पसंती बेकायदेशीर.
साखरपुडा बेकायदेशीर.
लग्न बेकायदेशीर.
हनिमून बेकायदेशीर.
पण झालेलं बाळ मात्र कायदेशीर.
याच धर्तीवर वरील मुद्याला जोडून आणखी एक मीम सोशल मीडियावर गाजत आहे ते पुढीलप्रमाणे...