मुंबई- मराठा आरक्षण संदर्भात सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित याचिका सारथी संस्थेचे प्रश्न आणि मराठा समाजातील प्रलंबित प्रश्नांबाबत आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात सर्व समाज प्रतिनिधींसोबत महत्त्वपूर्ण बैठक झाली. मराठा समाजाच्या प्रतिनिधींशी सखोल चर्चा केल्यानंतर धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांसोबत स्वतंत्र बैठक आयोजित केली आहे. तसेच आजच धोरणात्मक निर्णयांची घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी खासदार छत्रपती संभाजी महाराज यांना फोन करून बैठकीसाठी बोलावून घेतले होते. मंत्रालयाच्या समिती सभागृहात आज झालेल्या बैठकीमध्ये याचिकाकर्ते विनोद पाटील, विरेंद्र पवार विनायक मेटे आणि मराठा समाजातील विविध संघटनांचे प्रतिनिधी देखील उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व समाज प्रतिनिधींशी चर्चा करून मराठा समाजाचे प्रलंबित प्रश्न समजून घेतले.