मुंबई - कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील वैद्यकीय शिक्षण आणि त्यासाठीचे नियोजन अडचणीत आले आहे. पदवीच्या विद्यार्थ्यांना यादरम्यान कोरोनाच्या संकटामुळे परीक्षा देण्याऐवजी अहोरात्र रुग्णालयात आपली सेवा द्यावी लागत आहे. राज्यात बारावीचा निकालही रखडला असल्याने वैद्यकीयच्या प्रवेशाची प्रक्रिया थांबली आहे. तर दुसरीकडे पदवी-पदव्युत्तरच्या परीक्षाही लांबणीवर पडल्या असून कोरोनामुळे विद्यार्थ्यांना रुग्णालयात थेट सराव करण्यासाठी देण्यात येणाऱ्या क्लीनीकल पोस्टींगही होत नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांपुढे संबंधित विषयांमध्ये काय करायचे? असा प्रश्न पडला आहे.
राज्यात महाराष्ट्र राज्य आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या माध्यमातून वैद्यकीय शिक्षणाचा कारभार चालविला जातो. यात पदवी- पदव्युत्तरच्या ॲलोपॅथी, आयुर्वेदीक, होमिओपॅथी, युनानी, दंतचिकित्सा, फिजोओथेरपी, ऑक्युपेशनल, थेरपी, ऑडीओलॉजी, व स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजी, प्रोस्थेटीक्स व ऑरथोटक्स, नर्सिंग आणि बीपीएमटी आदी विद्याशाखांमध्ये ३१ हजार ९४७ विद्यार्थी क्षमता आहे. त्यापैकी केवळ ॲलोपॅथीच्या पदवीचे शिक्षण देणाऱ्या सरकारी, खासगीच्या ४२ संस्था राज्यात असून त्यामध्ये पदवीसाठी ६ हजार ४०० विद्यार्थी तर पदव्युत्तरच्या एकूण २२ संस्थांमध्ये २ हजार ३३७ विद्यार्थी शिक्षण घेताहेत.
आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून प्रत्येक पदवीच्या वर्षी अंतिम वर्षाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक हे नोव्हेंबर महिन्यातच तयार केले जाते. डिसेंबरमध्ये परीक्षा होते आणि मे महिन्यात याच अभ्यासक्रमांच्या पुरवणी परीक्षा होणार होत्या. परंतु, कोरोनाच्या संकटामुळे पदवी-पदव्युत्तरच्या परीक्षा या अद्यापही रखडल्या असून त्या १६ जुलैनंतर टप्प्याटप्प्याने आयोजित करण्याचे नियोजन विद्यापीठाने केले असल्याची माहिती विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. के. डी. चव्हाण यांनी दिली.
आमचे शिक्षण अडचणीत आले आहे - विद्यार्थी संघटना
कोरोनामुळे एमबीबीएसच्या पहिल्या, दुसऱ्या वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या. विद्यापीठाकडून अंतिम वर्षाची परीक्षा ही डिसेंबर महिन्यातच घेण्यता आली आहे. आता त्यानंतर आमची पुरवणी परीक्षा मे महिन्यात होती, ती कोरोनामुळे लांबणीवर पडल्याने त्यावर मोठा परिणाम झाला आहे. आता ही पुरवणी परीक्षा १६ जुलैनंतर घेतली जाणार असली तरी त्यासाठी अंतिम निर्णय झाला नाही. परंतु आम्हाला यासाठी किमान दीड महिना थेअरी, प्रॅक्टीकलसाठी हवा आहे. तो मिळणार नाही, दुसरे सर्वात महत्वाचे म्हणजे कोरोनामुळे आम्हाच्या शिक्षणावर सर्वात मोठा परिणाम हा क्लीनिकल पोस्टींगवर झाला आहे. सर्व रुग्णालये ही कोरोनाच्या उपचारात असल्याने आम्हाला या पोस्टींग मिळू शकल्या नाहीत. विशेष म्हणजे आमचे सर्व प्रक्टीकल्स आणि त्याच्या परीक्षाही थांबल्या असल्याने आमचे शिक्षण अडचणीत आले असल्याची माहिती जे. जे. रुग्णालय समूह व शासकीय रुग्णालय विद्यार्थी संघटनेचे सचिव डॉ. अनिकेत राठोड यांनी दिली.