मुंबई - कोरोनानंतर राज्याला नव्या आजाराचा धोका संभवत आहे. तो म्हणजे म्यूकरमायकोसिसचा (काळी बुरशी). राज्यात सुमारे 250 हून अधिक या आजाराचे रुग्ण असल्याचे राज्याचे वैद्यकीय शिक्षण संचालक डॉक्टर तात्याराव लहाने यांनी सांगितले आहे. 'हा आजार गंभीर आहे. वेळीच उपचार केला नाही तर डोळा निकामी होऊ शकतो किंवा मृत्यूही ओढवू शकतो' असा इशाराही त्यांनी दिला आहे. म्यूकरमायकोसिस हा आजार अनेक दिवसांपासून राज्यात आहे. यापूर्वी हा आजार असलेल्या रुग्णांची संख्या फार कमी होती. मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये हा आजार असलेल्या रुग्णांची संख्या वाढताना दिसत असल्याचे तात्याराव लहाने यांनी म्हटले.
वैद्यकीय शिक्षण संचालक डॉक्टर तात्याराव लहाने 'माती, हवा, कुजलेल्या ठिकाणी बुरशी असते. बुरशी नाकाद्वारे शरीरात प्रवेश करते. नाकाच्या मागच्या बाजूला सायनस या ठिकाणी ही बुरशी जमा होते. ती वाढत जाऊन मेंदूपर्यंत शकते', असं तात्याराव लहाने म्हणाले. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, हा आजार फक्त डोळ्यापुरताच मर्यादित नाही. हा आजार फुप्फुसांनाही होऊ शकतो किंवा आपल्या पचन संस्थेच्याजवळही येऊ शकतो. याची बाधा आपल्या त्वचेलाही होऊ शकते.
ही घ्या काळजी
'डोळ्यांना सूज येणे, डोकं दुखणे, ताप येणे, नाकातून पाणी गळणे, त्याचबरोबर टाळूला काळे डाग पडणे, त्या भागामध्ये बधिरता येणे, तसेच डोळ्यांची नजर कमी होणे, ही लक्षणे डॉक्टर तात्याराव लहाने यांनी सांगितली आहेत. 'कोरोनाच्या काळामध्ये ज्या रुग्णांना मधुमेह आहे किंवा ज्यांचा मधुमेह नियंत्रित नाही, तसेच ज्यांची प्रतिकार शक्ती कमी आहे; अशा रुग्णांना म्यूकरमायकोसिस आजाराची लागण होताना दिसते. या आजारापासून दूर राहायचे असेल तर मधुमेह नियंत्रित ठेवला पाहिजे. तसेच ज्या पदार्थाला बुरशी आहे, असे पदार्थ खाऊ नये. आपल्या शरीरात बुरशी जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. साधे डोके दुखत असेल तर काळी बुरशी हा आजार झाला आहे, असे समजू नये. इतर लक्षणे आहेत का ते अगोदर तपासून डॉक्टरांचा सल्ला घेणे हे महत्त्वाचे आहे', असेही डॉक्टर लहाने यांनी सांगितले.
'इन्फो टेरेसिन हे औषध म्यूकरमायकोसिसवर गुणकारी'
'या आजारावर औषधे आहेत. तसेच शस्त्रक्रियाही करून या आजाराला दूर ठेवता येऊ शकते. इन्फो टेरेसिन हे औषध या काळी बुरशी आजारावर परिणाम कारक आहे. औषधांचा तुटवडा सध्या मार्केटमध्ये निर्माण होत आहे. त्यामुळे लवकरात लवकर हे औषध उपलब्ध करून द्यावे. अशी मागणी देखील राज्य सरकारकडे केली आहे', असे तात्याराव लहाने यांनी सांगितले.
हेही वाचा -रेमडेसिवीर औषधीच्या 17 हजार कुपींच्या पहिल्या स्टॉकचे वितरण; वर्ध्यातील कंपनीकडून उत्पादन