मुंबई:शिवसेनेचे माजी आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या अंधेरी पूर्व, विधासभा पोटनिवडणुकीसाठी भाजपचे मुरजी पटेल यांनी उमेदवारी अर्ज मागे घेऊन या पोटनिवडणुकीतील हवाच काढून टाकली आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून आणण्यासाठी शिवसेनेकडून कंबर कसली गेली आहे. ही निवडणूक व्यवस्थित पार पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणेवरसुद्धा मोठा ताण आहे.
मशाल चिन्ह घरोघरी पोहोचवण्याचे आव्हान? अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके या मशाल या नवीन चिन्हावर पहिल्यांदाच निवडणूक लढवत असून राज्यात झालेल्या नाट्यमय सत्तांतर ही पहिलीच निवडणूक होत आहे. अशामध्ये एकीकडे मशाल हे चिन्ह घरोघरी पोहचून ऋतुजा लटके यांना भरघोस मतांनी निवडून आणण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे मोठ्या प्रमाणात प्रयत्न होत आहे. दुसरीकडे मात्र भाजपकडून या मतदानाविषयी निरुत्साह दिसून येत आहे. मोठा शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल केलेल्या मुर्जी पटेल यांना अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी दबावा खातर अर्ज मागे घ्यावा लागला, अशी प्रतिक्रिया भाजप कार्यकर्त्यांमध्ये असल्याकारणाने भाजपचे स्थानिक कार्यकर्ते किती मोठ्या प्रमाणामध्ये मतदानास बाहेर पडतील यावर सुद्धा प्रश्नचिन्ह आहे.
ऋतुजा लटकेंसाठी विजय सोप्पा ? भाजपचे मुरजी पटेल यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांची लढत इतर 6 जणांविरुद्ध होत आहे. यामध्ये आपली आपली पार्टीचे बाला वेंकटेश विनायक नाडार, राईट टू रिकॉल पार्टीचे मनोज श्रावण नायक, अपक्ष उमेदवार निना खेडेकर, फरहाना सिराज सय्यद, मिलिंद कांबळे आणि राजेश त्रिपाठी हे उमेदवार मैदानात आहेत. ऋतुजा लटके यांच्यासमोर हे उमेदवार फारच नवीन असले, तरी ही लढत लढावीच लागणार आहे. ऋतुजा लटके यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेबरोबर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांचे समर्थन ही असल्याकारणाने त्यांच्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये मतदान होणार आहे. यामुळे ऋतुजा लटके यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. लटके यांना जास्तीत जास्त मतदान करण्यासाठी शिवसैनिकांनी बाहेर पडावे असे आवाहन सुद्धा ठाकरे गटाकडून केले जात आहे. ही लढत एकतर्फी होणार असली, तरी इतर उमेदवारांचे डिपॉझिट जप्त करून अधिकाधिक मताधिक्याने लटके यांना विजयी करण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्याकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहेत.
निवडणूक व्यवस्थित पार पाडण्यासाठी शासनाकडून पूर्ण प्रयत्न: १६६- अंधेरी पूर्व मतदारसंघाची पोटनिवडणूक ही दिनांक ३ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ७ ते संध्याकाळी ६ या कालावधी दरम्यान पूर्ण शांततेत आणि निष्पक्षपणे पार पडेल, असा विश्वास सुद्धा मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी व्यक्त केला आहे. अंधेरी पूर्व या मतदारसंघाकरिता २ लाख ७१ हजार ५०२ मतदार संख्या आहे. याकरिता २५६ मतदान केंद्रे आहेत. यात २३९ मतदान केंद्र तळमजल्यावर असून १७ केंद्रे पहिल्या मजल्यावर आहेत. पहिल्या मजल्यावरील मतदान केंद्रांच्या ठिकाणी उद्वाहनाची अर्थात ‘लिफ्ट’ची सुविधा उपलब्ध आहे. या मतदारसंघात एकही असुरक्षित, संवेदनशील, अतिसंवेदनशील मतदान केंद्र नाही. ही पोटनिवडणूक १६६,अंधेरी पूर्व या मतदारसंघात असून मुंबई उपनगर जिल्ह्याच्या उर्वरित भागात आचारसंहिता लागू नाही. अशीही माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी दिली आहे. तसेच या पोटनिवडणुकीसाठी शासनाने पूर्ण तयारी केली असून अंधेरी पूर्व या मतदारसंघातील सर्व नागरिकांनी मतदान केंद्रावर वेळेत पोहोचून मतदान करावे, असेही आवाहनही चौधरी यांनी केले आहे.
मतदानासाठी मोठा फौज फाटा ! ही पोटनिवडणूक निष्पक्षपणे होण्यासाठी जिल्हा निवडणूक कार्यालयाच्या अंतर्गत जवळपास २ हजार कर्मचारी कार्यरत असणार आहेत. याव्यतिरिक्त कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने मुंबई पोलीस दल, राखीव पोलीस दल आणि अन्य सुरक्षा व्यवस्थादेखील सुसज्ज व तैनात असणार आहे. मतदान आणि मतमोजणी करताना कोणतीही समस्या येणार नाही. याकरिता सर्व कर्मचाऱ्यांना प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण देण्यात येत आहे. दिव्यांग आणि वयोवृद्ध मतदारांना मतदान केंद्रांवर येण्यास कोणताही त्रास होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने उद्वाहन (लिफ्ट) आणि उतार मार्गीका (रॅम्प) यांचीही सोय केली आहे. त्याचप्रमाणे उमेदवारांना या काळात लागणाऱ्या सर्व आवश्यक प्रमाणपत्रांसाठी एक खिडकी ‘सुविधा’ उपलब्ध आहे, अशी माहिती ही जिल्हाधिकारी यांनी दिली आहे.