मुंबई- प्रथम नागरिक असलेल्या महापौरांच्या कुटुंबीयांना महापालिकेकडून मिळणारी गाडी किशोरी पेडणेकर यांनी नाकारल्यानंतर आता त्यांनी आपले एक वर्षाचे मानधन महापौर निधीसाठी दिले आहे. महापौर निधीमधून मदत मागण्यासाठी मोठ्या प्रमाणात गरीब रुग्ण येतात. जास्तीत जास्त गरजूंना ही मदत मिळावी म्हणून आपले एक वर्षाचे मानधन महापौर निधीसाठी दिल्याचे महापौरांनी सांगितले.
हेही वाचा -'भाजप सरकार नसल्यानेच शांततेने आंदोलन करता आले', मुंबईतील आंदोलकांचे मत
मुंबईच्या महापौरांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना दोन वाहने दिली जातात. त्यापैकी कुटुंबीयांना मिळणारी गाडी महापौर किशोरी पेडणेकर यांनी पदावर विराजमान होताच नाकारली आहे. त्या गाडीवर होणारा खर्च महापौर निधीमध्ये जमा करावा, अशी मागणी त्यांनी केली होती. महापौर निधीला मदत करणाऱ्या दात्यांना ५० टक्केच इन्कम टॅक्समधून सूट मिळते, ही सूट १०० टक्के मिळावे त्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे महापौरांनी सांगितले.
महापौर निधीमधून आर्थिक मदत मिळावी म्हणून गरीब व गरजू रुग्णांकडून मोठ्या संख्येने अर्ज येत आहेत. यामधील जास्तीत जास्त गरजू रुग्णांना मदत करता यावी म्हणून महापौर पदावर निवड झाल्यापासून नोव्हेंबर, डिसेंबर या दोन महिन्याचे मानधन किशोरी पेडणेकर यांनी महापौर निधीसाठी दिले आहे. तसेच जानेवारी ते डिसेंबर 2020 या पुढील वर्षाचे मानधनही महापौर निधीमध्ये जमा करावे, असे पत्र महापौरांनी पालिका प्रशासनाला दिले आहे.