मुंबई-लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव. पक्षाला सोडून चाललेले नेते. नेतृत्वाचा अभाव. यामुळे काँग्रेस पुढे अनेक अडचणी आहेत. यातून बाहेर कसे पडावे? पक्षात पुन्हा जीव कसा आणावा? यासाठी काँग्रेस हायकमांडने एक मास्टर प्लान तयार केला आहे. हा प्लान यशस्वी झाल्यास काँग्रेस राज्यात पुन्हा मुसंडी मारेल, असा विश्वास राजकीय वर्तुळात व्यक्त केला जातोय.
दिग्गज मैदानात
काँग्रेसचा मास्टरप्लान ! त्यामुळे पक्ष राज्यात पुन्हा मारणार मुसंडी? - सोनिया आणि प्रियंका गांधी प्रचाराचा धुरळा उडवणार
माजी मंत्र्यांनाही मैदानात पूर्ण ताकदीने उतरण्याचे आदेश देण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीत पराभव झाला असला तरी काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग राज्यात आहेत. शिवाय नवमतदारांना आकर्षित करण्याची रणनिती काँग्रेसने आखली आहे.
राष्ट्रवादी बरोबर काँग्रेसचे जागा वाटप पूर्ण झाले आहे. काँग्रेस १२५ जागांवर लढणार आहे. या सर्व जागांवर तगडे उमेदवार देण्याची काँग्रेसने रणनिती आखली आहे. त्याचा एक भाग म्हणून राज्यातील ज्येष्ठ नेत्यांना निवडणूक रिंगणात उतरण्याचा आदेश देण्यात आला आहे. त्यात मुकूल वासनिक, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, नाना पटोले, विजय वडेट्टीवार, माणिकराव ठाकरे, राजीव सातव या दिग्गजांचा समावेश आहे. मुंबईतून मिलिंद देवरा, संजय निरूपम, एकनाथ गायकवाड, नसिम खान, बाबा सिद्धीकी यांनाही निवडणूक रिंगणात उतरण्याचे आदेश देण्यात आले आहे. तर युवा नेतृत्वालाही संधी देण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. त्यात सत्यजित तांबे, विश्वजित कदम, अमित देशमुख, धिरज देशमुख, आशिष देशमुख, कुणाल पाटील, अमित झनक, वर्षा गायकवाड यांना तयारीला लागण्याचे आदेश देण्यात आलेत.