मुंबई -मराठवाड्यातील तब्बल पाचहून अधिक जिल्ह्यांमध्ये मागील काही दिवसात परतीच्या पाऊस झाला. यामुळे राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडून आयोजित करण्यात आलेल्या सीईटी प्रवेश परीक्षेच्या पीसीएम व पीसीबी या गटाच्या परीक्षेला शेकडो विद्यार्थ्यांना मुकावे लागले. या विद्यार्थ्यांची विशेष सत्रात परीक्षा आयोजित करून घेण्यात येईल, अशी घोषणा उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली.
दरम्यान, 12 ऑक्टोबरला मुंबई आणि परिसरात वीज खंडित झाल्यामुळे शेकडो विद्यार्थ्यांना त्या दिवशी असलेल्या सीईटीच्या पीसीएम ग्रुपच्या परीक्षेला बसता आले नव्हते. त्या सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा मंगळवारी विशेष सत्रात आयोजित करण्यात आली होती. ती सुरळीत पार पडली, अशी माहिती राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून देण्यात आली.
मुंबई परिसरात अचानक वीज खंडित झाल्यामुळे असंख्य विद्यार्थ्यांना आपल्या परीक्षा केंद्रावर पोहोचता आले नव्हते. तर अनेक परीक्षा केंद्रांमध्ये वीज नसल्याने या परीक्षा होऊ शकल्या नव्हत्या. त्यामुळे या परीक्षाही विशेष सत्रात घेतल्या जातील अशी घोषणा उदय सामंत यांनी केली होती.
दरम्यान, राज्यातील पुणे, सांगली, सातारा, उस्मानाबाद, लातूर आदी जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात परतीचा पाऊस कोसळल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी याच दरम्यान विद्यार्थ्यांना एमएच-सीईटीच्या प्रवेश परीक्षेला मुकावे लागले आहे. त्यामुळे या परीक्षेला ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या परीक्षेचे प्रवेशपत्र डाऊनलोड केलेले आहे. मात्र, अतिवृष्टीच्या कारणामुळे ते परीक्षेला बसू शकले नाहीत, अशा सर्व विद्यार्थ्यांना या परीक्षेची पुन्हा संधी दिली जाणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ट्विट करून दिली.