मुंबई - अमेझॉन आणि फ्लिपकार्ट कंपनीने त्यांच्या ई-कॉमर्स संकेतस्थळावर मराठी भाषेचा समावेश करण्यासाठी सकारात्मकता दर्शवली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ई-कॉमर्स कंपन्यांच्या ऑनलाइन शॉपिंग अॅपमध्ये मराठी भाषेचा समावेश करण्याची मागणी केली होती. याबाबत सात दिवसानंतर खळ्ळ-खट्ट्याक आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर या कंपन्यांकडून यासंदर्भात सकारात्मकता दाखवली आहे. अमेझॉनचे शिष्टमंडळ आज मुंबईत मनसे नेत्यांची भेट घेत आहे.
अमेझॉन आणि फ्लिपकार्टच्या ई-कॉमर्स संकेतस्थळावर, अनुप्रयोगांवर (अॅप) मराठी भाषेचा समावेश करण्यासाठी मनसे आक्रमक झाली होती. अमेझॉन आणि फ्लिपकार्ट या दोन्ही संस्थांना सात दिवसांची वेळ मनसेने दिली होती. मराठीच्या मागणीनंतर जवळपास २ कोटी प्रॉडक्टची 'मेगा चैन' तयार करण्याचे दोन्ही कंपन्यांपुढे आव्हान आहे. पण, यासंदर्भात स्व:त अमेझाॅनचे संस्थापक जेफ बेझोज यांनी मनसेने केलेल्या मराठी भाषेचा मागणीच्या मेलची दखल घेत लवकर आम्ही यावर काम करत मराठी उपलब्ध करून देऊ, असे म्हटले आहे.