मुंबई- फ्रान्समध्ये होणाऱ्या 'कान' आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात इंडियन पेव्हॅलियनच्या मार्केट सेक्शनमध्ये दाखवण्यासाठी केंद्र सरकारने दोन सिनेमाची निवड केलेली आहे. यात मराठी सिनेमा 'माई घाट : क्राइम नं.१०३/२००५' आणि गुजराती सिनेमा 'हेलारो' यांची निवड निश्चित करण्यात आली असल्याची घोषणा केंद्रिय माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली आहे.
माई घाट चित्रपटाचे पोस्टर... जगभरातील कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा ७३ वा कान फिल्म फेस्टिव्हल आधी पुढे ढकलण्यात आला होता. मात्र नंतर तो सलग पाच दिवस व्हर्च्युअल स्वरूपात भरवण्यात येणार असल्याची घोषणा आयोजकांनी केली. महोत्सव व्हर्च्युअल असल्याने या महोत्सवातील इंडियन पेव्हॅलियनचे उद्घाटन देखील व्हर्च्युअल स्वरूपात करण्यात आले. या उद्घाटन प्रसंगी जावडेकर यांनी यंदा हे दोन सिनेमे महोत्सवातील मार्केट सेक्शनमध्ये दाखवण्यात येणार असल्याचे जाहीर केले.
हालेरो चित्रपटाचे पोस्टर... या सोबतच त्यांनी गोव्यात यावर्षी २० नोव्हेंबर पासून सुरू होणाऱ्या 'इफ्फी' म्हणजेच इंडियन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलच्या समणिकेचे अनावरण केले. यावेळी बोलताना अधिकाधिक परदेशी निर्माते आणि दिग्दर्शक यांनी भारतात जास्तीत जास्त शूटींग करावे, यासाठी सर्व परवानग्या अधिक सुलभतेने देण्याला प्राधान्य देणार असल्याच जाहीर केले. कान महोत्सवात इंडियन पेव्हॅलियनमधील मार्केट सेक्शनमध्ये दिग्दर्शक अनंत महादेवन दिग्दर्शित 'माई घाट' हा सिनेमा दाखवण्यात येणार आहे. या सिनेमात अभिनेत्री उषा जाधव ही मुख्य भूमिकेत असून तिच्याशिवाय सुहासिनी मुळे, कमलेश सावंत, गिरीश ओक, मिलिंद शिंदे, गणेश यादव, विभावरी देशपांडे, विवेक चाबुकस्वार आणि हर्षद शिंदे यांच्या मुख्य भूमिका आहेत.
तर हेलारो या सिनेमाचे दिग्दर्शन अभिषेक शहा याने केले आहे. या सिनेमाला गतवर्षी सर्वोत्कृष्ट प्रादेशिक सिनेमाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला होता. त्यानंतर गतवर्षी झालेल्या इफ्फी चित्रपट महोत्सवात हालेरो या सिनेमाला इंडियन पेनोरामामधील ओपनिंग फिल्म बनण्याचा बहुमान मिळाला होता.
इंडियन पेव्हॅलियनसाठी निवड म्हणजे कान फिल्म फेस्टिव्हलसाठी निवड का?
भारतीय प्रेक्षकांच्या भावनांशी गेल्या काही वर्षापासून अनेक निर्माते दिग्दर्शक आपला सिनेमा कान फिल्म फेस्टिव्हलसाठी निवडला गेल्याचे सांगून खेळत आहेत. भारताकडून कान फेस्टिव्हलसाठी ऑफिशियल इन्ट्री असे म्हणून या सिनेमाची भारतात जोरदार जाहिरात केली जाते. मात्र प्रत्यक्षात भारत सरकार कान महोत्सवात दरवर्षी आयोजित करत असलेल्या इंडियन पेव्हॅलियनमध्ये मार्केट विभागात दाखवण्यासाठी या सिनेमाची निवड करत असते. याचा अर्थ सिनेमा महोत्सवासाठी निवडला गेला असे होत नाही.
यंदा देखील माई घाट आणि हालेरो हे दोन्ही सिनेमे इंडियन पेव्हॅलियनमध्ये दाखवण्यासाठीच निवडण्यात आले आहेत. गेली काही वर्षे महाराष्ट्र सरकार देखील मराठी सिनेमे कान महोत्सवासाठी पाठवले आहेत. हे चित्रपट या इंडियन पेव्हॅलियनमध्येच दाखवले जात असतात. मात्र असे असले तरीही कान महोत्सवात गेल्या काही वर्षात भारतीय सिनेमाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. त्यामुळे इंडियन पेव्हॅलियनमध्ये दाखवल्या जाणाऱ्या सिनेमाकडे जगाचे लक्ष असते. इथंवर पोहोचणे हा देखील त्या सिनेमासाठी मोठा बहुमानच असतो. मात्र अशा पद्धतीने दाखवला गेलेला सिनेमा महोत्सवासाठी निवडला गेला, असे सांगून त्याचे मार्केटिंग करणे, हा चुकीचा पायंडा पडत असल्याचे निदर्शक आहे.
हेही वाचा -दीपिका पदुकोण 'द्रौपदी' साकारणाऱ्या महाभारतमध्ये 'दुर्योधना'ची भूमिका प्रभासने नाकारली?