मुंबई:मराठा आरक्षणाची मागणी राज्यभरातून होत असताना मोठी बातमी समोर आली आहे. जालना येथील तरुणानं मुंबईत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या केली.सुनिल बाबुराव कावळे ( रा. चिकनगाव ता. अंबड जि. जालना) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. तरुणाचा मृतदेह सायन रुग्णालयात असल्याची माहिती समोर येत आहे.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील हे कालपासून (बुधवारी) मुंबई दौऱ्यावर आहेत. आज ते नवी मुंबईसह अनेक शहराचा दौरा करणार आहेत. यापूर्वी मनोज जरांगे-पाटील यांनी 150 एकर जागेवर लाखोंची सभा घेतली. एकीकडं मराठा आरक्षणासाठी लाखोंचे शांततेत मोर्चे पार पडले. तर दुसरीकडं मराठा युवकानं मराठा आरक्षणासाठी आत्महत्या घेतली आहे.
आत्महत्या करण्यापूर्वी लिहिली चिठ्ठी- सुनिल कावळे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी चार पानांची चिठ्ठी लिहिली आहे. महाराष्ट्राचे कुळदैवत तुळजाभवानीमाता, हिंदूधर्म रक्षक, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा... जय भवानी... शेतकऱ्यांच्या मुला-मुलींच्या भविष्याचा प्रश्न आहे. मराठी शेतकरी, मुला-मुलींच्या शिक्षणासाठी आरक्षण पाहिजे. या मुंबईमध्ये सणवार काय येत राहतील, जात राहतील.
सर्वांना मुंबईत येण्याचं केलं आवाहन-संपूर्ण महाराष्ट्रातून मराठ्यांनो २४ ऑक्टोबरला मुंबईत या... आता ही लढाई जिंकायची आहे. शाळेतील मुल-मुली या कॉलेजमधील या...चार दिवस शाळेत गेला नाहीतरी काही फरक पडत नाही. पण आता ही लढाई आरपार आहे. मला माफ करा..., आता एकच मिशन मराठा आरक्षण एक मराठा... लाख मराठा..., आता कोणत्या नेत्याच्या सभेला जायचंच नाही, हा लढा गरजवंताचा, लढा नीतीवंत मराठ्यांचा आणि लढा शौर्यवंताचा असल्याचं आत्महत्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटलयं. मला मोठ्या मनानं माफ करा. मी क्षमा मागतो. सर्वांनी माफ करा, असेही आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटलं आहे.