मुंबई : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे जालन्यातील आतंरवाली सराटी येथे आमरण उपोषण करत आहेत. आज उपोषणाचा सातवा दिवस आहे. दरम्यान मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. त्यामुळं सरकारकडून हालचालींना वेग आला आहे. रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांची भेट घेतली. याआधी भाजपा नेत्यांची बैठक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी पार पडली. यानंतर आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीत शिंदे समिताचा अहवाल यावर चर्चा होणार आहे. मात्र त्याआधीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे-पाटील यांच्याशी फोनवरुन संवाद साधला आहे. जवळपास दोघांमध्ये २० मिनिटे चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.
पाणी घ्या.. मुख्यमंत्र्यांची विनंती : जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे. त्यामुळं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी फोनवरुन जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची चौकशी केली. सरकार मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक आहे. पाणी घ्या... अशी मुख्यमंत्र्यांनी जरांगे-पाटलांना विनंती केली. यानंतर जरांगे पाटील यांनी पाणी घेतले. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे हे अंतरवाली सराटीत पोहोचले असून, ते जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करणार आहेत.