मुंबई Maratha Reservation Protest :मनोज जरंगे पाटील हे मराठा आरक्षण मिळावं, यासाठी दुसऱ्या टप्प्यातील उपोषणाला जालन्यात बसले आहेत. मराठा आरक्षणाचा लढा अधिक तीव्र होत असल्यामुळे आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मंगळवारी मध्यरात्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' निवासस्थानी भेट घेत तब्बल दीड तास चर्चा केली. या बैठकीत मराठा आरक्षणावरती अनेक खलबतं झाल्याची माहिती समोर येत आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात झालेल्या बैठकीत विशेष अधिवेशन घेण्याबाबत देखील चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.
सरकारनं बोलावली सर्वपक्षीय नेत्यांची बैठक : आज मराठा आरक्षणासाठी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक सरकारकडून बोलावण्यात आलीय. या बैठकीला विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, यांच्यासह राज्यातील सर्व पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांना आमंत्रण देण्यात आलंय. त्यामुळं आज ही बैठक झाल्यानंतर मराठा आरक्षणावर राज्य सरकारकडून मोठा निर्णय होण्याची शक्यता असल्याचं बोललं जातय. या बैठकीला निमंत्रण नसल्याचं म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकावर टीका केलीय. संजय राऊत यांनी एक्स या सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले, शिवसेनेचे 16 आमदार व 6 खासदार आहेत. सर्वोच्च न्यायालयात खटला सुरू आहे. तरीही शिवसेनेला बैठकीला बोलावलं नाही. मात्र, एक आमदार असलेल्यांना आमंत्रण आहे.