मुंबई -सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला दिलेल्या स्थगितीनंतर राज्यात मराठा समाजाकडून पुन्हा आंदोलने सुरू झाली आहेत. तर, दुसरीकडे ५२ टक्के असलेल्या ओबीसींच्या आरक्षणातून मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली जात असून यामुळे दोन्ही समाजातील तेढ वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर ओबीसी विचारवंत प्रा. श्रावण देवरे यांनी मराठा आरक्षणाच्या मुळाशी प्रतिक्रांतीची लक्षणे असल्याचा गंभीर दावा केला आहे. त,र संभाजी ब्रिगेड आणि मराठा आरक्षणाच्या लढ्यातील ज्येष्ठ नेते संतोष शिंदे यांनी मराठा समाजाला घटनात्मक आरक्षण मिळाल्याशिवाय पर्याय नसल्याचे मत व्यक्त केले आहे. यासाठी त्यांनी राज्यातील सर्वपक्षीय खासदारांनी संसदेत एकत्र येऊन हा विषय सोडविण्याचे आवाहन केले आहे.
प्रा. श्रावण देवरे म्हणतात की, राजकीय अस्थिरतेतून सामाजिक अस्थिरता आणि सामाजिक अस्थिरतेमधून प्रतिक्रांती आणि या प्रतिक्रांतीमधून जातीव्यवस्था व वर्णव्यवस्था आणि शोषणव्यवस्था पक्की करणे, हा त्यामागचा हेतू आहे. हाच उद्देश सफल करण्यासाठी अगदी लहान-लहान कारणासाठी झुंडशाही करणे, बेकायदेशीर आंदोलने करणे, बेकायदेशीर मागण्या करणे आणि सरकारला अडचणीत आणणे हे प्रकार मूठभर लोकांकडून सुरू आहेत. माध्यमांना हाताशी धरून असे एक चित्र निर्माण केले जात आहे की, संपूर्ण महाराष्ट्र पेटला आहे. परंतु, यामागे वेगळी कारणे असल्याचा दावाही प्रा. देवरे यांनी केला.
राम मंदिराच्या प्रश्नाच्या वेळी हे अगदी मूठभर 4 टक्के लोक होते. याच लोकांनी झुंडशाही केली. 1990 नंतर ओबीसींना मंडल आयोग लागू झाला आणि याच दरम्यान ओबीसींना थोडे काही मिळायला लागले. त्याच काळात मंदिराच्या, धर्माच्या नावाने काही मूठभर लोकांनी झुंडशाही सुरू केली होती. अशीच झुंडशाही महाराष्ट्रात आता मराठा आरक्षणाच्या निमित्ताने पुढे आली आहे. ही मूठभर झुंडशाही मूठभर लोकांचीच आहे. अनेक प्रकारच्या खोटे चिठ्ठ्या दाखवून आत्महत्या घडवून आणणे आणि इतके बलिदान झाले, तितके बलिदान झाले असे दाखवणे, असा सगळा प्रकार सुरू आहे. खरे तर, या सर्व आत्महत्यांची सीबीआय चौकशी झाल्यास तर, यामागे असलेले बहुतेक लोक जेलमध्ये जातील, असा गंभीर आरोप देवरे यांनी केला. तसेच, हे गुंडगिरी करणारे लोक, हे सर्व संघ, भाजपाचे हस्तक असल्याचा आरोपही त्यांनी केला.
महाराष्ट्रात सध्या जे काही चाललेले आहे, त्याचे मुख्य लक्ष्य हे ओबीसी दाखवण्यासाठी आहे. मात्र, त्याआडून या देशात आणि राज्यात जातीव्यवस्था मजबूत करणे हे त्यांचे खरे लक्ष्य असून यासाठी राज्यातील जे पुरोगामी विचार प्रवाह आहेत, या सर्व प्रवाहांनी ही गंभीर गोष्ट लक्षात घेतले पाहिजे, असेही प्रा. देवरे म्हणाले. यासाठीच शेतकऱ्यांच्या, कामगारांच्या विरोधात विधेयके मंजूर होत आहेत. या सर्वांची गोळाबेरीज करून पाहिली तर सर्व फुले, शाहू, आंबेडकरवादी आणि पुरोगामी विचारांच्या शक्तीने एकत्र यावे, असे आपल्याला वाटत असल्याचे देवरे म्हणाले.