मुंबई- सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाच्या संदर्भात सरकारने दिरंगाई केली, त्यामुळेच या आरक्षणाला स्थगिती मिळाली, असा आरोप करत मराठा क्रांती मोर्चाकडून सरकारविरोधात उद्या रविवारी मुंबईत संघर्ष यात्रा काढली जाणार आहे, यासाठीची माहिती मराठा क्रांती मोर्चाच्या महामुंबईचे राजाराम मांगले यांनी दिली.
मराठा क्रांती मोर्चा काढणार सरकारविरोधात संघर्ष यात्रा मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत मराठा क्रांती मोर्चाकडून मंत्रिमंडळाच्या मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण आणि सदस्य विजय वडेट्टीवार यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अन्यथा त्यांना महाराष्ट्रातील रस्त्यावर कुठेही फिरू देणार नाही, असा गंभीर इशारा देण्यात आला. आम्ही आता यापुढे कोणत्याही आंदोलनाला परवानगी घेणार नाही. त्यामुळे अशोक चव्हाण यांचे अध्यक्ष पद काढून ते एकनाथ शिंदे यांच्याकडे द्यावे आणि यापुढे आमच्या आरक्षणाला कोणी आडवे येत असेल तर आम्ही त्यांच्या विरोधात जाऊ, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे अंकुश कदम यांनी दिला. संघर्ष यात्रेत जास्तीत जास्त मराठा बांधवांनी सामील व्हावे
मराठा क्रांती मोर्चाकडून रविवारी, 1 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता या संघर्ष यात्रेला लालबाग येथून सुरुवात होणार आहे. ही संघर्ष यात्रा पुढे सायन, कुर्ला, चेंबूर, मानखुर्द, घाटकोपर, कत्रमवारनगर व भांडुप याठिकाणी थांबून तेथील समन्वयक व कार्यकर्त्यांसोबत सभा घेऊन मराठा आरक्षणाची सद्यस्थिती व राज्य सरकारबाबतची अस्वस्थता आणि त्याबाबतची आंदोलनाची पुढील दिशा या बाबत चर्चा होईल व त्यानंतर सदर यात्रेची सांगता ही ठाणे येथे होईल, सदर संघर्ष यात्रेत जास्तीत जास्त मराठा बांधवांनी सामील व्हावे, असे आवाहन मराठा क्रांती मोर्चा महामुंबईतर्फे करण्यात येत आहे.
मराठा समाजाला रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही
मराठा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रवेश व नोकर भरतीबाबत होणारे नुकसान, यामुळे मराठा समाजामध्ये प्रचंड अस्वस्थता आहे, अशा परिस्थितीत आता मराठा समाजाला रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय उरलेला नाही. याच पार्श्वभूमीवर मराठा समाजामध्ये असलेला आक्रोश व्यक्त करण्यासाठी व सध्या आरक्षणाची व इतर मागण्यांची सद्यस्थिती यावर चर्चा करत या यात्रेची सांगता संध्याकाळी ठाणे येथे होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.