मुंबई -देशात सर्वाधिक कोरोना रुग्णांची संख्या असलेल्या महाराष्ट्रामध्ये कोरोना योद्धे मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित झाले आहेत. कोरोना संसर्ग झालेल्यांमध्ये डॉक्टर, परिचारिका, वॉर्डबॉय आणि पोलीस कर्मचारी, एसटी महामंडळाचे कर्मचारी यांचा समावेश आहे. कोरोना संसर्गाच्या सुरुवाती काळापासून कोरोना योद्ध्यांचे कौतुक जरी होत असला तरी त्यांना सामाजिक अवहेलना सहन करावी लागले. अनेक गृहनिर्माण संस्थांमध्ये कोरोना योद्ध्यांना येण्या जाण्यावरही प्रतिबंध घालण्यात आले होते.
मुंबई बाहेरून वसई,ठाणे, कल्याण आणि इतर भागातून डॉक्टर, पोलीस, प्रशासकीय कर्मचारी रोज मुंबई मध्ये येत होते आणि पुन्हा संध्याकाळी त्यांच्या घरी परत जात होते. यामुळे त्यांना आणि त्यांच्या परिवाराला कोरोनाचा धोका संभवतो अशा कर्मचाऱ्यांना मुंबई तात्पुरती निवासस्थानाची सोय करावी, अशी मागणी उच्च न्यायालयात याचिकेद्वारे करण्यात आली होती.
कोरोनाच्या संकटाच्या काळात व्यक्तिगत हिता पेक्षा सार्वजनिक हित पाहणे महत्त्वाचे आहे. कोरोना योद्धे संकट असताना अत्यावश्यक सेवेत असल्याने कामावर यावे लागते. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन सर्व पातळीवर प्रयत्न करत आहे. कोरोना योद्धेही स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करत आहेत. त्यांच्या कुटुंबियांना देखील त्यांची काळजी आहे आणि ते त्यासाठी खबरदारी घेत आहेत. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना कुटुंबापासून वेगळे ठेवणे सध्याच्या घडीला योग्य नाही. निडरपणे आणि प्रतिबंध न करता त्यांना काम करू द्यावे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले होते.
पाच हजारांपेक्षा जास्त पोलीस कोरोनाबाधित
सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण महाराष्ट्रात आहेत.तसेच कोरोनाबाधितांमध्ये पोलिसांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. धक्कादायक बाब म्हणजे रोज मोठ्या संख्येने पोलीस कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे राज्यात एकूण पाच हजार पेक्षा जास्त पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी सात जणांचा मृत्यू झाला असून चार हजार पेक्षा जास्त पोलिसांना उपचारांनंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे.
कोरोनाविरुद्ध आरोग्य कर्मचारी, सफाई कर्मचारी यांच्याप्रमाणे पोलीस फ्रण्ट लाईनवर लढत आहेत. परंतु या कोरोना योद्ध्यांमध्येच संसर्ग वाढला आहे. त्यात पोलिसांची संख्या सर्वाधिक आहे. कोरोनाची लागण झालेल्यांमध्ये 901 कर्मचारी आणि 106 अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
सध्या कोरोनाबाधित रुग्णांची पाच गटांमध्ये वर्गीकरण करण्यात येऊ शकते. कोरोनाचा संसर्ग झालेला पहिला वर्ग, संसर्ग झाला असून ही लक्षणे नसलेला दुसरा वर्ग,लक्षणे असलेला तिसरा वर्ग, लक्षणे वाढून कोरोना बाधित ठरलेला चौथा वर्ग आणि गंभीर प्रकृती असलेला कोरोनाबाधित यांचा पाचवा वर्ग.यामधील तिसरा गट हा जास्त धोकादायक ठरत आहे कारण या गटातील लोकांना साधा सर्दी-खोकला आहे ,असे समजून लॉकडाऊन असल्याने ते डॉक्टरांकडे जात नाहीत. जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी ते बाहेर पडतात त्यामुळे त्यांच्याकडून संसर्गाची जास्त भीती आहे. त्यामुळे योग्य आणि अचूक असलेले किट विकसित करून दुसऱ्या आणि तिचा घटकापर्यंत पोहोचवणे आगामी काळात आव्हान ठरणार असल्याचे वैद्यकीय तज्ञ डॉ. रेवत काविंदे यांनी म्हटले आहे.
देशभरात 99 डॉक्टरांनी गमावला जीव
इंडियन मेडिकल असोसिएशनने एक आकडेवीरी जाहीर केली आहे. त्यानुसार कोरोना रुग्णांवर उपचार करताना देशातील 99 डॉक्टरांना आपला जीव गमवावा लागल्याचे म्हटले आहे. आयएमएच्या आकडेवारीनुसार कर्तव्यावर असताना 1302 डॉक्टरांना कोरोना संसर्ग झाला होता. 99 डॉक्टरांचा मृत्यू झाला त्यापैकी 73 डॉक्टर वय वर्षे 50 वरील होते. 19 डॉक्टरांचे वय 35 ते 50 वर्षे होते. 7 डॉक्टरांचे वय 35 पेक्षा कमी होते असेही सांगण्यात आले आहे. कोरोना संसर्ग झालेल्या 1302 डॉक्टरांमध्ये 586 प्रॅक्टिसिंग डॉक्टर आणि 566 रेसिडेंट डॉक्टर आणि 150 सर्जन असल्याची माहिती आयएमएने दिली आहे.