मुंबई- काँग्रेस ही विचारांची चळवळ आहे. चळवळीसोबत बांधले गेलेले लोक काँग्रेस सोडणार नाहीत. मात्र, व्यवसाय आणि राजकीय हितसंबंध असणारे केवळ १ टक्का लोक काँग्रेस सोडू शकतात, असे माणिकराव ठाकरे म्हणाले. ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेस नेत्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत. तसेच काही दिवसांपूर्वी राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिला होता. आता ते भाजपमध्ये जाणार आहेत. तसेच काँग्रेसचे काही नेते भाजपच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे ते नेते भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज माणिकराव ठाकरे बोलत होते.
वंचित आघाडी काँग्रेससोबत असती तर नक्कीच यश मिळाले असते. वंचित आघाडी वेगळी लढल्याने त्याचा फटका त्यांना व काँग्रेसलाही बसला आहे. मात्र, आता पुन्हा नव्याने विधानसभेला लढणार असल्याचे ठाकरे म्हणाले.