मुंबई Sextortion Trap : ग्रँड रोड परिसरात राहणाऱ्या साठ वर्षांच्या निवृत्त शिक्षकाला सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकवून पावणेचार लाखांचा गंडा घालण्यात आला होता. ही घटना 2 फेब्रुवारी 2023 ला घडली होती. याप्रकरणी तक्रारदार सेवा निवृत्त शिक्षकानं डी बी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याची उकल आता करण्यात आली असून पोलिसांनी राजस्थानला जाऊन आरोपीला अटक केली आहे. प्रेमचंद शर्मा वय 39 असं आरोपीचं नाव आहे. त्याला आज कोर्टानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
शिक्षकाला पावणे चार लाखांचा गंडा : 60 वर्षीय सेवानिवृत्त शिक्षकाला दोन फेब्रुवारीला रात्री साडेनऊच्या सुमारास व्हाट्सअपवर चॅटिंग सुरू असताना एका महिलेचा व्हिडिओ कॉल आला. नग्न अवस्थेत महिलेनं व्हिडिओ कॉल आल्यानं वृद्ध शिक्षक घाबरून गेला. त्यानंतर सेवानिवृत्त शिक्षकाकडं सायबर पोलीस असल्याचं सांगून हेमंत कुमार यानं तुमचा अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड न करण्यासाठी 32 हजार 400 रुपये मागितले. त्यानंतर ॲमेझॉन साइटवर अश्लील व्हिडिओ अपलोड करण्याची धमकी देण्यात आली. ॲमेझॉन साईटवरती व्हिडिओ अपलोड न करण्यासाठी 65 हजार 99 रुपये घेण्यात आले. दरम्यान फेसबुक इंस्टाग्राम या सोशल मीडियावर अश्लील व्हिडिओ अपलोड न करण्यासाठी 81 हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. अशा प्रकारे वेगवेगळ्या कारणानं शिक्षकाला पावणे चार लाखांना फसवण्यात आलं.
असा घडला प्रकार : राकेश अस्थाना नावाच्या व्यक्तीनं पीडित मुलीनं तक्रार दाखल केली असून ती मागे घेण्यासाठी दोन लाख रुपये उकळले. दरम्यान व्हाट्सअप व्हिडिओ कॉलवर नग्न अवस्थेत व्हिडिओ कॉल करणाऱ्या मुलीनं आत्महत्या केली आहे. याबाबत पोलीस कारवाई नको हवी असेल, तर आठ लाख रुपये द्यावे, लागतील अशी मागणी करण्यात आली. आठ लाखांची मागणी केल्यानंतर निवृत्त शिक्षकाला आपली फसवणूक होत असल्याचं लक्षात आलं. त्यामुळं शिक्षकानं थेट डी बी मार्ग पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार डी बी मार्ग पोलीस ठाण्यात भारतीय दंड संविधान कलम 419, 420 384, 34 आणि माहिती व तंत्रज्ञान कायदा कलम 66 डी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींनी गुन्हा करताना वापरलेला मोबाईल क्रमांक बंद येत असल्यानं पोलिसांना आरोपीचा शोध घेण्यासाठी बराच वेळ लागला.