मुंबई- मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट दहाने केलेल्या कारवाईदरम्यान लहान मुलांच्या खेळणी विकण्याचा फेरीचा व्यवसाय करणाऱ्या आरोपीला चरस विकण्याच्या गुन्ह्याखाली अटक केली आहे. जावेद माजिद खान (वय 34 वर्षे, रा. धारावी), असे आरोपीचे नाव आहे.
खेळणी विकण्याच्या नावाखाली अमली पदार्थ विकणाऱ्या आरोपीला अटक - मुंबई जिल्हा बातमी
लहान मुलांच्या खेळणी विकण्याच्या नावाखालाी अमली पदार्थ विकणाऱ्या आरोपीला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट दहाने अटक केली आहे. त्याच्याकडून तब्बल 22 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
16 जूनला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट 10 ला मिळालेल्या गुप्त माहितीवरून देवनार पोलीस ठाण्याच्या हद्दीत जनता टिंबर मार्केटजवळ अमली पदार्थांची विक्री केली जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार या ठिकाणी सापळा रचण्यात आला. त्या ठिकाणी एक व्यक्ती संशयास्पदरीत्या आजूबाजूला सारखा पाहत असताना पोलिसांच्या नजरेत आला. त्याच्या हालचालींवर संशय आल्याने पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली. त्यावेळी त्याच्याकडील निळ्या रंगाच्या प्लास्टिकच्या लहान कॅरीबॅगमध्ये चरस हे अमली पदार्थ मिळून आले. पोलिसांनी त्याची झडती घेतल्यानंतर आरोपीकडून 750 ग्रॅम चरस जप्त केली आहे. याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत 22 लाख 50 हजार एवढी आहे.