मुंबई -कर्नाटकमधील सरकार पाडण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मदत करत आहेत, असा गंभीर आरोप काँग्रेसचे राज्य प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांनी केला. ते आज प्रदेश काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या पदग्रहण सोहळ्याचा कार्यक्रमासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आले होते. यावेळी ते बोलत होते.
आमचे कर्नाटकमधील सरकार चांगले चालत असताना ते सरकार पाडण्यासाठी भाजपकडून अत्यंत खालच्या स्तराचे राजकारण केले जात आहे. कर्नाटक राज्यातील आमदार भाजपचे लोक मुंबईत आणतात, त्यांना मदत करतात. आमच्या सरकारमधील १२ आमदारांना याच लोकांनी इकडे ठेवले आहे. एका-एका व्यक्तीला स्पेशल फ्लाईटने इकडे आणले जात असून त्यांना फडणवीस हे आपल्या सरकार आणि पोलिसांच्या मदतीने मदत करत आहेत. त्यामुळे हे लोक लोकशाही मोडीत काढत आहेत, असा आरोप खरगेंनी केला.
कर्नाटकमध्ये लोकांनी निवडून दिलेले सरकार भाजपचे लोक अडचणीत आणत आहेत. हे लोक ३ महिन्यापासून निराश असल्यामुळेच लोकांनी निवडून दिलेले सरकार उलथून टाकण्यासाठी डाव रचत आहेत. त्यामुळे हे लोक आयकर विभागाला पाठी लावून लोकांना घाबरवत आहेत. आज ज्या आमच्या एका आमदाराला मुंबईत सरकारी रुग्णालयात आणण्यात आले आहे. त्यांना कर्नाटकमधून कधी येथे आणले, हे कोणाला कळले नाही. कर्नाटक मधील जयदेव हे ह्दय रोगावरील उपचारासाठी सर्वात प्रसिद्ध रुग्णालय असताना येथे आमच्या एका आमदाराला कोणी आणले? असा सवालही त्यांनी केला. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत या लोकांना त्यांची जागा दाखविण्यासाठी हातात हात देऊन राज्यात नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासोबत लढा द्या आणि आपले सरकार आणा, असे आवाहन खरगे यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नेहमीच संविधान आणि लोकशाहीच्या संदर्भात बाहेर सांगत असतात. मात्र, हा त्यांचा देखावा आहे, ते खरे नाही. एकदा मोदींनी सेंट्रल हॉलमध्ये ठेवलेल्या संविधानाच्या पुस्तकाला नमस्कार केला, पण आज संविधानाची रोज हत्या केली जाते, त्यावर ते कधीही बोलत नाहीत. यामुळे मोदी हे 'बोले जैसा चाले'असे वागत नसल्याचे सांगत खरगेंनी त्यांच्यावर टीका केला.