राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे माहिती देताना मुंबई: राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे वीस आमदार तर शिवसेनेचे उरलेले तेरा आमदार आपल्या संपर्कात आहेत. असे सांगून राज्यात लवकरच नवीन समीकरणे दिसतील अशी शक्यता व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. राजकीय नेत्यांकडून विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत, या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
कोण कोणाच्या संपर्कात?: यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना तपासे म्हणाले की, उदय सामंत हे राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार होते, त्यानंतर ते शिवसेनेत दाखल झाले आहेत. हे त्यांनी विसरू नये तसेच गेल्या दोन दिवसात त्यांनी शरद पवार यांची दोन वेळा भेट घेतली आहे. यामुळे कोण कोणाच्या संपर्कात आहे आणि कोण कुठे जाणार हे येणारा काळच ठरवेल. असे सांगत तपासे यांनी नवीन शक्यता आणि राजकीय समीकरण यांचे संकेत दिले. तसेच उदय सामंत हे अतिशय उत्साहित आहेत, त्यामुळे ते अशा पद्धतीची चर्चा करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निश्चितच कुठल्याही अन्य पक्षाच्या संपर्कात नाहीत याची आपण ग्वाही देतो असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्री कार्यालयाबाबत योग्य वेळ येतात बोलणार: ठाणे जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री कार्यालय सुरू करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येत आहे, त्यासाठी कामाच्या निविदाही काढण्यात आल्या आहेत. या कार्यालयावर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आला. हा खर्च योग्य आहे की नाही याबाबत महालेखा परीक्षकांच्या अहवालामधून स्पष्ट होईलच त्यानंतर त्यावर आपण बोलू असेही त्यांनी सांगितले.
बाहेरील नेत्यांना भाजपात संधी: भारतीय जनता पक्षामध्ये सध्या बाहेरच्या पक्षामधून आलेल्या लोकांना अधिक संधी दिली जात आहे. पक्षातील लोकांना डावलले जात असल्याचे समोर येत आहे. हे अतिशय आश्चर्यकारक असून राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नावाची आता मुख्यमंत्री म्हणून चर्चा सुरू आहे. पक्षातील अनेक दिग्गज नेत्यांना डावलून जर विखे पाटील यांना मुख्यमंत्री पदी विराजमान करण्याचा प्रयत्न सुरू असेल तर, पॅराशुट लँडिंग करून आलेल्या नेत्यांना अधिक संधी भाजपात मिळते हे यावरून स्पष्ट होईल, असे मतही तपासे यांनी यावेळी व्यक्त केले.
हेही वाचा: Mahesh Tapase सरकार स्थापनेचे राज्यपालांकडून आमंत्रणच नव्हते मग हे सरकार संविधानिक कसे तपासे