मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात भाजपचे नेते निलेश राणे यांनी ट्विट केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. ट्वीटवरून राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपाला लक्ष्य केले आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुम्हाला ट्वीट मान्य आहे का? असा प्रश्न विचारत भाजपने ते स्पष्ट करावे अशा प्रकारचे आवाहन केले आहे. ट्वीट मान्य नसेल तर निलेश राणे आणि भाजपने महाराष्ट्राची आणि राष्ट्रवादीची जाहीर माफी मागावी अशी मागणी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता महेश तपासे यांनी केली आहे.
२४ तासाचा दिला अल्टीमेटम : भाजप नेते निलेश राणे यांनी शरद पवार यांची औरंगजेबासोबत तुलना करणारे ट्वीट पोस्ट केले होते. सदर ट्वीट डिलीट करण्यासाठी २४ तासाचा वेळ राष्ट्रवादीकडून निलेश राणे यांना देण्यात आला आहे. राणेंचे ट्वीट राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या भावना दुखावणारे आहे.
ट्वीट डिलीट करून माफी मागावी : राणे कुटुंबाच्या हॉस्पिटल उद्घाटनाला शरद पवारांना आमंत्रित करतात. म्हणजे नारायण राणे शरद पवारांना मानतात. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील गुरूस्थानी मानत असल्याचे वारंवार पाहिले आहे. शरद पवारांना औरंगजेबाची उपमा देणे किती योग्य आहे? राणे यांनी 24 तासात ट्वीट डिलीट करून, आक्षेपार्ह वक्तव्याबाबत माफी मागावी. सुमोटो अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली. तसेच ज्याचे काहीच कर्तृत्व नसलेल्या निलेश राणेसारखा व्यक्ती ५६ वर्षाची राजकीय कारकीर्द असणाऱ्या, शरद पवार यांची औरंगजेबासोबत तुलना करतात, यावर भाजपा गप्प बसते. गोपीचंद पडळकरची काय लायकी आहे. स्वतःला निलेश राणे काय समजतात, असा सवाल यावेळी करण्यात आला.