मुंबई - कर्नाटकातील विजयानंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडीने मोट बांधणीच्या हालचाली सुरू केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे प्रणेते शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली आहे. सिल्वर ओक येथे दुपारी चार वाजता ही बैठक पार पडणार आहे. आघाडीतील मतभेद आणि आमदारांच्या अपात्रतेबाबत या बैठकीत चर्चा केली जाणार आहे.
कर्नाटकाच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठे यश मिळाले. भाजपचा दारुण पराभव काँग्रेसने केल्यानंतर महाविकास आघाडीने भाजपविरोधात कंबर कसली आहे. अलीकडच्या काळात भाजपशासित राज्य नसलेल्या राज्यात फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे. सत्तेसाठी भाजपकडून सर्व मर्यादा पायदळी तुडवल्याचा विरोधकांकडून आरोप होत आहे. भाजपला आता सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी देशभरात विरोधी पक्षांचे नेते एकत्र येत आहेत. महाराष्ट्रात देखील आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला रोखण्यासाठी महाविकास आघाडीने रणनीती आखायला सुरुवात केली आहे.
तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते बैठकीला राहणार हजर- गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर येत आहेत. यावरदेखील बैठकीत चर्चा होणार आहे. या बैठकीला महाविकास आघाडीतील प्रमुख नेते ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर राष्ट्रवादीकडून जयंत पाटील, छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आणि शिवसेना ठाकरे पक्षाकडून उद्धव ठाकरे संजय राऊत, अनिल देसाई, अरविंद सावंत अनिल परब उपस्थित राहणार आहेत.
या विषयावर होणार चर्चा-सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या आपत्रेतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. अध्यक्षांकडून निकालासाठी तीन महिन्याचा कालावधी लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे. अध्यक्षांकडून याबाबत चुकीचा निर्णय येण्याची शक्यता आघाडीच्या नेत्यांना आहे. त्यामुळे अध्यक्षांच्या भूमिकेवर आगामी काळात कशा प्रकारची निर्णय घेता येऊ शकतो, यावर आज चर्चा केली जाणार असल्याचे समजते. विरोधी पक्षातील आमदारांची केंद्रीय एजन्सीच्या मार्फत होत असलेली मुस्कटदाबी यावर देखील चर्चा होणार असल्याचा समजते.
एकजुटीसाठी शरद पवारांचा पुढाकार-शिंदे फडवणीस सरकारच्या विरोधामध्ये महाविकास आघाडीने राज्यभर वज्रमूठ सभा घेतल्या होत्या. वज्रमुठ सभेमध्ये सर्वात जास्त पुढाकार हा ठाकरे गटाच्या नेत्यांकडून पाहायला मिळाला होता. वज्रमूठ सभेत राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नेते फक्त भाषण देऊन जात होते. नियोजनामध्ये त्यांचा सहभाग दिसत नसल्याचा पाहायला मिळत होते. यावरून देखील सत्ताधाऱ्यांनी महाविकास आघाडीला लक्ष्य केले होते. त्यातच तिन्ही पक्षातील नेते एकमेकांविरोधात वेगवेगळे वक्तव्य करत होते. यामुळे महाविकास आघाडी टिकणार का यावर प्रश्न निर्माण केले जात आहे. येणाऱ्या विधानसभा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी स्वतः महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांना एकजूट करण्यासाठी महत्त्वाची बैठक बोलावली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये तिन्ही पक्षांचे बळ एकत्रित करून पुन्हा महाविकास आघाडीला बहुमत मिळवून देते का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.