मुंबई -ठाकरे सरकारने शरजील उस्मानीवर गुन्हा दाखल करायला दिरंगाई का केली? एल्गार परिषदेत काही ना काही गडबड, धार्मिक भावना दुखावल्या जातात, अशी पार्श्वभूमी असतानाही परिषदेला परवानगी का दिली? मुंबईतून शरजीलला पळून जाण्यास महाविकास आघाडीने मदत केली, असा आरोप आमदार आशिष शेलार यांनी आज केला.
हेही वाचा -'हे' सात जिल्हे वगळता, राज्यातील खासगी रुग्णालयांवरील निर्बंध हटवले
खऱ्या हिंदुत्वाचा क्लास नागपूरला जाऊन घ्या
हिंदुत्वाचा खरा क्लास कुठे असतो, त्या नागपूरच्या कार्यालयात वारंवार या आधी आपण भेटलो आहोत. आताही जाऊन यावे, असा टोला शेलार यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला. भाजपला बाजूला ठेवायचा कू हेतूचा पर्याय म्हणून जे सत्तेत आले, तेही दुसऱ्याच्या कुबड्या घेऊन आपल्या विचारांना तिलांजली देऊन त्यांनी देशातल्या जनतेच्या मानसिकतेच्या मतांवर भाष्य करणे म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे. मुख्यमंत्री महोदयांनी सूर्यावर थुंकण्याचा प्रयोग करू नये, अशा शब्दात शेलार यांनी मुख्यमंत्र्यांच्या विधानाचा समाचार घेतला.
शिवसेनेची अवस्था खाली डोके वर पाय
शिवसेनेची अवस्था खाली डोके वर पाय, अशी झाली आहे. महाराष्ट्रातील कुठल्याही व्यक्तीवर, कुठल्याही नेत्यावर परराज्यातून कोणी टिप्पणी केली तर यांना महाराष्ट्र द्रोह आठवतो आणि हे आंदोलन करू लागतात, पण परदेशातून आपल्या देशातील व्यक्तीवर कोणी टीकाटिप्पणी केली की यांना आनंदाच्या उकळ्या फुटतात. संजय राऊतांनी परदेशातील कनेक्शन जनतेसमोर मांडावे. आंदोलन कोणी कशा पद्धतीने करावे याची नियमावली स्पष्ट आहे. लाल किल्ल्यावरचा तिरंगा उतरवून आंदोलन करण्याला तुमचे समर्थन आहे का? त्यावेळी तुम्ही बोलले का नाहीत? असा सवाल शेलार यांनी संजय राऊत यांना केला.
आता शरजीलला अटक केली जाईल, असे सांगत आहेत? कधी अटक करणार? आम्ही मागणी केल्यावर? भाजपने आंदोलन केल्यावर? या परिषदेला परवानगी का दिली? परिषदेत वक्तव्य केले त्यानंतर त्याला मुंबई आणि महाराष्ट्राबाहेर का जाऊ दिले? उस्मानीला मुंबई आणि महाराष्ट्राबाहेर पळून जाण्यास सत्तेत बसलेल्या महाराष्ट्र विकास आघाडीने मदत केली आहे, असा आरोप शेलार यांनी केला.