मुंबई : २० मे जागतिक मधदिन दिवस म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने राज्यातील मधूमक्षिका पालन व्यवसायाला चालना कशी देता येईल याचा विचार खादी, ग्रामोद्योग महामंडळाने केला आहे. खादी ग्रामोद्योग महामंडळाच्या वतीने सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर जवळील मांगुर गावात मधुमक्षिका पालन व्यवसायास चालना देण्यात आली आहे. या गावातील सुमारे 80 टक्के लोक मधुमक्षिका पालन करतात. अशा पद्धतीने मधुमक्षिका पालन करणाऱ्या गावांची निर्मिती करणे, संबंधित गावातील रोजगारासाठी इच्छुक असलेल्या ग्रामस्थांना मधुमक्षिका पालनाचे प्रशिक्षण देणे यासाठी महामंडळाने आता पुढाकार घेतला आहे.
सातारा जिल्ह्यातील मांगुर गावाप्रमाणे आता राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये मधुमक्षिका पालन करणाऱ्या गावाचा महामंडळाच्या वतीने शोध घेतला जात आहे. जे गाव मधुमक्षिका पालनासाठी तयारी दर्शवले अशा गावाने त्यासंदर्भातला ठराव खादी ग्रामोद्योग महामंडळाला पाठवणे आवश्यक आहे. अशा गावांना महामंडळातर्फे प्रशिक्षण, व्यवसायासाठी अनुदान, मदत करण्यात येणार - रवींद्र साठे, सभापती, खादी ग्रामोद्योग, महामंडळ
जांभळापासून करणार मधनिर्मिती : जांभूळ हे फळ मधुमेहासाठी अत्यंत परिणामकारक असल्याचे मानले जाते. त्यामुळे या फळापासून मध निर्मिती केली तर, ती मधुमेही व्यक्तींसाठी उपयोगी ठरू शकते. हे फळ अत्यंत औषधी, गुणकारी आहे. त्यामुळे जांभळापासून मध निर्मिती करण्याचा प्रकल्प महाराष्ट्र राज्य खादी, ग्रामोद्योग महामंडळातर्फे राबविण्यात येणार आहे. त्यासाठी मुंबईपासून जवळ असलेल्या बदलापूर येथील दहिवली परिसरात असलेल्या शेकडो जांभळांच्या झाडांचा उपयोग करण्यात येणार आहे असेही साठे यांनी सांगितले.