मुंबई: राज्यातील 36 पैकी 34 जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस होऊ लागला आहे. गेल्या दोन दिवसापासून राज्याच्या विविध भागांमध्ये पावसाचा जोर वाढला आहे. हवामान विभागाने आजही राज्यात मुसळधार पाऊस असेल, असा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 5 जिल्ह्यांना उद्यासाठी रेड अलर्ट देण्यात आला आहे. ठाण्यासह बाकीच्या जिल्ह्यांमध्ये पुढील 48 तासात अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
हवामान अंदाज : हवामान विभागानुसार सध्या कमी दाबाचा पट्टा 20 अंश उत्तरेला आहे. सामान्य परिस्थितीतीहून तो दक्षिणेकडे झुकलेला आहे. उत्तर पश्चिम बंगालची खाडी आणि ओरिसा किनारपट्टी क्षेत्रामध्ये कमी दाबाचे क्षेत्रही तयार झाले असल्याने पावसाचा जोर कायम राहणार आहे. हवामान विभागाने पालघर जिल्ह्यासाठी आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. येथील जव्हार मोखाडा विक्रमगड वाडा भागात जोरदार पावसाला सुरुवात देखील झाली आहे. दरम्यान येथील शाळांना जिल्हा प्रशासानाने सुट्टी दिली आहे. हवामान खात्याने पुणे आणि रायगडसाठी रेड अलर्ट दिला आहे. तर पालघर, ठाणे, मुंबई, सातारा आणि रत्नागिरीसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसापासून मुसळधार पाऊस होत आहे. आज देखली येथे पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे.