मुंबई Sanjay Raut Share Macau Video : शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मकाऊ इथला फोटो पोस्ट केल्यानंतर राज्याच्या राजकारणात वादळ उठलं होतं. त्यानंतर आता संजय राऊत यांनी मकाऊ येथील व्हिडिओ शेअर केला आहे. मकाऊ इथली एक रात्र, असं कॅप्शन संजय राऊत यांनी दिलं आहे. त्यानंतर पिक्चर अभी बाकी है, असंही त्यांनी यावेळी नमूद केलं आहे. त्यामुळे पुन्हा राजकारण तापणार असल्याचं स्पष्ट होत आहे.
पिक्चर अभी बाकी है :शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांचा फोटो शेअर केल्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. मात्र त्यानंतर भाजपासह चंद्रशेखर बावनकुळे यांनीही संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिलं होतं. त्यानंतर आता पुन्हा खासदार संजय राऊत यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांचा व्हिडिओ शेअर केल्यानं आता पुन्हा वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
राज्याच्या राजकारणात अलिकडच्या काळात वाद आणि आरोप प्रत्यारोप मोठ्या प्रमाणात होत आहेत. त्यातच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचं प्रकरण ताजं आहे. त्यांचा एक फोटो संजय राऊत यांनी ट्विट केल्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या. राष्ट्रवादीनं तर त्यापेक्षा इतर प्रश्न महत्वाचे असल्याचं सांगून वादच नसल्याचं स्पष्ट केलं. मात्र भाजपाच्या अनेक नेत्यांनी इशारावजा प्रतिक्रियाच जास्त दिल्याच्या दिसल्या. सुरुवातीला बावनकुळे यांनी तर सारवासारवीची भूमिका घेतली. फडणवीसांनीही डिप्लोमॅटिक प्रतिक्रिया दिली. भाजपा नेते मोहित कंबोज यांनी एक तरी व्हिडिओ प्रसिद्ध करुन दाखवा असं आव्हान वजा इशारा राऊत यांना दिला होता. या सगळ्या पार्श्वभूमिवर पुन्हा एकदा राऊत यांनी नवीन टीजर टाईप व्हिडिओ प्रसिद्ध केल्यानं हे प्रकरण एवढ्यातच शमेल असं वाटत नाही.
हेही वाचा :
- "मी कुणाच्या बापाला घाबरत नाही, माझ्याकडे आणखी 27 फोटो आहेत"; बावनकुळे प्रकरणावरुन राऊतांचा पुन्हा हल्लाबोल
- रेस्टॉरंट आणि कसिनो एकच; राऊतांच्या पोस्टवर चंद्रशेखर बावनकुळेंचं स्पष्टीकरण
- 'फोटोवरुन भाजपाचीच हिट विकेट', संजय राऊत पुन्हा गरजले