महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Sanjay Raut On Eknath Shinde : अत्यंत लाचार मुख्यमंत्री सत्तेवर बसवला; नीती आयोगाच्या बैठकीतील ठरावावरुन संजय राऊत यांचा संताप - मास्टर प्लॅन

महाराष्ट्राच्या खुर्चीवर अत्यंत लाचार मुख्यमंत्री बसवल्याची टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली. मुंबईचा घास गिळंकृत करण्यासाठी केंद्र सरकार गेल्या अनेक वर्षापासून डाव टाकत असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

Sanjay Raut On Eknath Shinde
खासदार संजय राऊत

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 30, 2023, 2:22 PM IST

Updated : Aug 30, 2023, 3:04 PM IST

खासदार संजय राऊत

मुंबई :शहराच्याआर्थिक विकासासाठी मंगळवारी नीती आयोगाच्या बैठकीत मास्टर प्लॅन तयार करण्याबाबत प्राथमिक रुपरेषा सादर करण्यात आली. नीती आयोग पुढील चार महिन्यांत यासाठी एक योजनाही सादर करणार आहे. हा आराखडा तयार करण्यासाठी, राज्य सरकार पूर्णपणे स्वतंत्र आणि समर्पित नोडल अधिकाऱ्यांची एक टीम नियुक्त करणार आहे. यावर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सडकून टीका केली आहे.

मुंबई गिळण्याचा भयंकर डाव :मुंबईत आपल्या निवासस्थानी माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, "आज अत्यंत धक्कादायक बातमी समोर आलेली आहे. मुंबई गिळण्याचा हा अत्यंत भयंकर असा डाव आहे. त्यासाठी उद्धव ठाकरे यांचं सरकार पाडलं. त्यासाठी शिवसेना फोडली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडल्यानंतर आता केंद्र सरकारला मुंबईवर ताबा हवा आहे. मुंबई गिळायची आणि विकायची आहे. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी राहू नये. राजधानी असली तरी त्यावर महाराष्ट्राचं नियंत्रण राहू नये, यासाठी किमान दहा वर्ष हे मोदी सरकार प्रयत्न करत आहे. त्यांनी सुरुवातीला मुंबई कमजोर केली. मुंबईतील व्यवसाय आंतरराष्ट्रीय कार्यालय हे गुजरातमध्ये खेचून नेलं. मुंबईच्या आर्थिक नाड्या आवळल्या" असा आरोप संजय राऊत यांनी केला.

अत्यंत लाचार मुख्यमंत्री सत्तेवर बसवला :शेवटी मुंबईचा विकास आता महाराष्ट्र सरकार करणार नाही. त्यासाठी निवडणुका होऊ दिल्या जात नाहीत. मुंबईची सर्व सूत्रं ही ठरल्याप्रमाणे मोदी सरकारनं उद्योगपतींकडं सोपवली आहेत. आता त्यांचा खरा चेहरा उघड झाला. हे शिवसेनेनं होऊ दिलं नसतं. म्हणून, शिवसेना फोडण्यात आली. अत्यंत लाचार मुख्यमंत्री सत्तेवर बसवून त्यांना हवं ते करून घेतलं, असा हल्लाबोलही खासदार राऊत यांनी यावेळी केला.

या मुख्यमंत्र्यांमध्ये आणि त्यांच्या सरकारमध्ये मराठी म्हणून स्वाभिमान थोडा तरी शिल्लक असेल तर राजीनामा देऊन मोदी सरकारला जाब विचारावा - खासदार संजय राऊत

स्वाभिमानावर बुलडोझर फिरवला :105 हुतात्म्यांच्या बलिदानातून मुंबई महाराष्ट्राला मिळाली आहे. मराठी माणसाला स्वाभिमानानं जगता यावं म्हणून बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केली. परंतु, आज मोदी शाहांच्या सरकारनं या स्वाभिमानावर बुलडोझर फिरवला. हे मिंधे सरकार सगळं उघड्या डोळ्यानं पाहात आहे. एकनाथ शिंदे हे लाचार, गुडघे टेकणारे मुख्यमंत्री आहेत. इतिहासात त्यांची अशीच नोंद होईल. गेली दहा वर्षे मोदी सरकारनं लूट केली. गॅस सिलेंडरचे कमी केलेले दर म्हणजे लुटीतील दोनशे रुपयाचा तुकडा सामान्यांच्या तोंडावर फेकला जात आहे. आम्ही 'इंडिया' स्थापन केली हे लूट थांबविण्यासाठीच,' अशी कडाडून टीका खासदार राऊत यांनी केली आहे.

हुकूमशाहीचा आणि भाजपाचा पराभव झालेला असेल :31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबरला मुंबईत 'इंडिया' आघाडीची बैठक होणार आहे. या बैठकीबाबत बोलताना खासदार राऊत म्हणाले की, "आम्ही अनेक महिन्यांपासून तयारी करत आहोत. शिवसेनेकडं यजमान पद असलं, तरी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस हे आमच्या सोबत आहेत. त्यांच्यावरदेखील अनेक जबाबदाऱ्या आहेत. मंगळवारी आम्ही सर्व नेते एकत्र होतो. आम्ही एकत्र काम करत आहोत. तयारी पूर्ण झाली आहे. आज संध्याकाळी चार वाजता ग्रँड हयातमध्ये पत्रकार परिषद ठेवलेली आहे. कालपासूनच सर्व प्रतिनिधींचं आगमन होत आहे. पारंपरिक पद्धतीनं त्यांचं स्वागत केलं जाईल. मी खात्रीनं सांगतो 2024 मध्ये हुकूमशाहीचा आणि भाजपाचा पराभव झालेला असेल', असंही संजय राऊत यांनी यावेळी ठणकावलं.

हेही वाचा :

  1. Sunil Raut On Offer : 'मला 100 कोटींची ऑफर, आमदार सुनील राऊतांच्या गौप्यस्फोटानं राजकारणात खळबळ
  2. Sanjay Raut On Sharad Pawar : शरद पवारांच्या विश्वासाहर्तेवर प्रश्नचिन्ह? पवारांनी उत्तर द्यावे - संजय राऊत
Last Updated : Aug 30, 2023, 3:04 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details