मुंबई :महाविकास आघाडीत जागावाटपावरून चर्चा सुरू आहेत. दुसरीकडे ठाकरे गट, राष्ट्रवादी व काँग्रेसमधील नेत्यांकडून महाविकास आघाडीत एकी असल्याबाबतचे विधाने करण्यात येत आहेत. प्रत्यक्षात जागा वाटपाबाबत तिन्ही पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थित पक्षाच्या सर्व आमदारांची बैठक पार पडली. बैठकीत कर्नाटकामध्ये काँग्रेस पक्षाने अखलेल्या रणनीतीवर चर्चा झाली. त्यासोबत भाजप कोणत्या ठिकाणी कोणत्या कारणामुळे कमी पडला यावर देखील चर्चा करण्यात आली. पक्षातील आमदारांकडून मतदारसंघाचा आढावा घेतला. त्यासोबत कोणत्या ठिकाणी आपल्या पक्षाला बहुमत मिळू शकते, याची माहिती शरद पवारांनी जाणून घेतली. जर महाविकास आघाडीतील मित्र पक्षाला जागा सोडली तर काय परिणाम होऊ शकतो, या सर्व बाबींवर चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. महाविकास आघाडीत एकजूट ठेवण्यासाठी सर्वांनी काळजीपूर्वक विधान करण्याचा सल्ला देखील पवार यांनी दिल्याचे बोलले जात आहे.
कोणताही फरक पडणार नाही- राजकीय विश्लेषक चंदन शिरोळे म्हणाले, कीकर्नाटक निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला चांगले यश मिळाल्यामुळे अनेक राजकीय पक्षांमध्ये खळबळ उडालेली आहे. शरद पवार यांनी देखील राष्ट्रवादी पक्षाचा विस्तार मोठ्या प्रमाणात होण्यासाठी सध्या बैठकांचे सत्र सुरू केले होते. तिन्ही पक्ष बैठक घेत आहेत. त्यामुळे या बैठकींचा परिणाम महाविकास आघाडीत होणार नसल्याचे मत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक चंदन शिरोळे यांनी व्यक्त केले.
महाविकास आघाडीमध्ये नंबर वन पक्ष बनण्यासाठी देखील स्पर्धा सुरू झाली आहे. हा एक नैसर्गिक स्वभावच आहे. कोणताही पक्ष आपला पक्ष विस्तार करण्यासाठी धडपड करत असतो-ज्येष्ठ राजकीय विश्लेषक चंदन शिरोळे
महाविकास आघाडीला नंबर एक आणण्यासाठी धडपड-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ता क्लाईड क्रॅस्टो म्हणाले, की सगळ्याच पक्षांना आपला पक्ष मोठा करण्याचा अधिकार आहे. आमच्या महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांना आपण मोठे झाले पाहिजे असे वाटणे साहजिक आहे.राजकीय पक्षांचा मूळ हेतू हाच असतो की पक्षाचा विस्तार करणे आणि त्यासाठी सर्वस्व पणाला लावणे. सध्या महाविकास आघाडीतील आम्ही तिन्ही पक्ष एकत्र आहोत. आघाडीसाठी तिन्ही पक्षांचे नेते एकत्रितपणे सत्ताधाऱ्यांविरोधात रान उठविणार आहोत.