पहा काय म्हणाले अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी सुनील तटकरे यांची नियुक्ती झाल्याची घोषणा पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी केली आहे. तर अनिल पाटील यांची महाराष्ट्र विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रतोदपदी नियुक्ती केली गेली आहे. पक्षाने अजित पवार यांची विधीमंडळ नेतेपदी नियुक्ती केली आहे. तर रुपाली चाकणकर यांची राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षापदी निवड करण्यात आली आहे. युवा राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षपदी सुरज चव्हाण, प्रवक्ते पदी अमोल, मिटकरी, आनंद परांजपे आणि सुरज चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
'राष्ट्रीय अध्यक्षपदी शरद पवार कायम राहतील' : सुनील तटकरे म्हणाले की, मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली आहे. मी महाराष्ट्रात पक्ष मजबूत करेन. मी पक्षाच्या सर्व नेत्यांना विश्वासात घेतले आहे. मी सर्व आमदार आणि जिल्हा परिषद नेत्यांची बैठकही बोलावली आहे. अजित पवार म्हणाले की, 'राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी शरद पवारंच कायम राहतील. पक्ष कुणाचा हा निर्णय निवडणूक आयोग घेईल'.
जयंत पाटील, जितेंद्र आव्हाडांना अपात्र ठरवण्याचं पत्र दिलं : अजित पवार पुढे म्हणाले की, बहुसंख्य आमदार आमच्या बरोबर असल्याने उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. आम्ही पक्ष सत्तेत आणून शरद पवारांना गुरुदक्षिणा दिली आहे. नऊ आमदारांवर कारवाईची भाषा म्हणून जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांना अपात्र ठरवण्याचं पत्र विधानसभा अध्यक्षांना दिले असल्याचे अजित पवार यावेळी म्हणाले. 5 जुलैला पक्षाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीला पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना येण्याचे आवाहन अजित पवारांनी केले आहे.
'बहुसंख्य आमदार आमच्या बरोबर' : प्रफुल्ल पटेल म्हणाले की, 'अजित पवारांच्या निर्णयाला अनेक नेत्यांचा पाठिंबा आहे. आम्हीच पक्ष असल्याने संख्या सांगणार नाही. बहुसंख्य आमदार आमच्या बरोबर आहेत. पक्ष आणि चिन्हावर वाद न घालण्याचा आमचा प्रयत्न असेल'. ते पुढे म्हणाले की, 'पक्षाने माझ्यावरती राष्ट्रीय कार्याध्यक्षाची जबाबदारी दिली. सर्व अधिकार देखील मला देण्यात आले होते. तीन वर्षात कार्यकारणी बदल होणे अपेक्षित होते, मात्र निवडणुका झाल्या नाही. त्यामुळे प्रदेशाध्यक्षपदावरती जयंत पाटील कायम राहिले. आज मी त्यांना त्या पदावरून कार्यमुक्त करत आहे'.
हे ही वाचा :
- Maharashtra Political Crisis : साहेबांकडे जावे की दादांकडे; आमदारांची झाली गोची, पाहा आकडेवारी
- Maharashtra Political Crisis : प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंवर कारवाई करा, सुप्रिया सुळेंचे शरद पवारांना पत्र
- Maharashtra Political Crisis : नऊ आमदार वगळता इतरांसाठी दरवाजे खुले, जयंत पाटील यांची स्पष्टोक्ती